रत्नागिरी : विधानसभा निवडणुकीत बुधवारी पार पडलेल्या मतदान प्रक्रियेत जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदारसंघात मतदारांनी मोठ्या प्रमाणात मतदान केले. राजापूर व चिपळूण विधानसभेसाठी सर्वाधिक मतदान झाले असून या ठिकाणी काँटे की टक्कर दिसून येत आहे. या निवडणुकीत 38 उमेदवारांचे राजकीय भवितव्य ईव्हीएममध्ये बंदिस्त झाले. यावेळी वाढीव मतांचा फायदा नक्की कुणाला होणार, हे शनिवारी स्पष्ट होणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यात पाचही मतदारसंघांत मिळून सुमारे 65 टक्के मतदान झाल्याचा अंदाज प्रशासनाकडून वर्तवण्यात आला आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात पाचही विधानसभा मतदारसंघांत महाविकास आघाडी विरोधात महायुती अशीच टक्कर दिसून येत आहे. दापोली मतदारसंघात महायुतीकडून आमदार योगेश कदम रिंगणात असून विरोधात मविआकडून माजी आमदार संजय कदम उभे आहेत. या ठिकाणी जोरदार लढत दिसून येत असून, योगेश कदम यांनी आपलाच विजय होणार असल्याचा दावा केला आहे. विशेष म्हणजे या ठिकाणी त्यांनी विजयी मिरवणुकीसाठी रथही सज्ज केला आहे. सायंकाळी 5 पर्यंत 59.2 टक्के इतके मतदान झाले होते.(Maharashtra assembly poll)
याठिकाणी सुमारे 63 टक्केपयर्र्त मतदान होण्याची शक्यता आहे. तर गुहागर मतदारसंघात उबाठाचे आमदार भास्कर जाधव विरोधात गुहागरचे माजी नगराध्यक्ष राजेश बेंडल अशी लढत होत आहे. राजेश बेंडल हे नवखे असले तरी कुणबी समाजामध्ये एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून त्यांची चांगली ओळख आहे. त्यामुळे त्यांनी शेवटच्या क्षणी या मतदारसंघात ‘काँटे की टक्कर’ दिल्याचे चित्र आहे. बेंडल यांच्यासाठी मुंबईतून मोठ्या प्रमाणात चाकरमानी मतदानासाठी गावी पोहचल्याची चर्चा आहे. या मतदारसंघात 59.5 टक्के मतदान सायंकाळी 5 वाजेपर्यंत झाले असून या ठिकाणी 63 ते 64 टक्के मतदान होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
सर्वाधिक चर्चेची लढत चिपळूण मतदारसंघात होत असून, राष्ट्रवादीचे आमदार शेखर निकम विरोधात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार प्रशांत यादव हे आमनेसामने आहेत. यादव यांनी चिपळूण मतदारसंघात प्रथमच निकम यांच्यासमोरील आव्हान कठीण करुन टाकले आहे. चिपळूणमध्ये 5 वाजेपयर्र्त जिल्ह्यातील सर्वाधिक मतदान 63.51 टक्के झाले होते. दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात मतदान करण्यासाठी कार्यकर्त्यांना घराबाहेर आणत, मतदान करुन घेतले.(Maharashtra assembly poll)
रत्नागिरीमध्ये राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत हे महायुतीकडून रिंगणात असून विरोधात उबाठाचे बाळ माने विरोधात आहेत. रत्नागिरीतही सुरुवातीला जोरदार लढत होण्याची अपेक्षा होती. परंतु, तालुक्यात सामंत पॅर्टन पुन्हा चालणार असल्याचे चित्र आहे. याठिकाणीही सायंकाळी 5 पर्यंत 59 टक्के मतदान झाले होते. जिल्ह्यातील राजापूर मतदारसंघातही तिरंगी लढत दिसून येत आहे. उबाठाचे आमदार राजन साळवी हे मविआकडून मैदानात असून, महायुतीकडून किरण उर्फ भैया सामंत तर अपक्ष म्हणून काँग्रेसकडून अविनाश लाड रिंगणात आहेत. या ठिकाणी 61.5 टक्के मतदान झाले असून, वाढीव मतदानाचा लाभ कुणाला मिळणार याकडे मतदारांचे लक्ष लागले आहे.
जिल्ह्यात अनेक मतदान केंद्रावर सायंकाळी पाचनंतर मतदानासाठी मोठ्याप्रमाणात मतदारांनी रांगा लावल्या होत्या. सहा वाजेपर्यंत आलेल्या सर्वच मतदारांना नंबरच्या चिठ्ठ्या देण्यात आल्या. त्यामुळे काही केंद्रांवर उशिरापर्यंत मतदान सुरु होते.
जिल्ह्यात गुहागर, राजापूरसह चिपळूणमध्ये वाढलेले मतदान नक्की कुणाला तारणार याकडेही राजकीय पक्षांचे लक्ष लागले होते. सायंकाळनंतर उमेदवारांसह पक्षांचेप्रमुख पदाधिकारी झालेल्या मतदानाची टक्केवारी जाणून कुणाला किती मते मिळतील याचा अंदाज स्थानिक पदाधिकार्यांकडून घेत होते.(Maharashtra assembly poll)
जिल्ह्यात मतदानाची प्रक्रिया शांततेत पार पडली. प्रशासकीय यंत्रणा आणि पोलिस कर्मचारी यांनी मतदान शांततेत होण्यासाठी मोठी मेहनत घेतली. मतदान केंद्रावर पोलिस बंदोबस्ताला असणार्या पोलिस व होमगार्ड यांनी बंदोबस्तासोबतच नागरिकांना मतदानासाठी मदतीचा हात दिला.