

नाशिक : विधानसभा निवडणुकीमुळे राज्यात १५ ऑक्टोबरपासून आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे नाशिक परिक्षेत्रात १५ ऑक्टोबर ते ८ नोव्हेंबर या २३ दिवसांत नाशिक ग्रामीणसह इतर चार जिल्ह्यांमध्ये ग्रामीण पोलिसांनी वेगवेगळ्या कारवायांमध्ये ४९ कोटी ७ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्यात शस्त्रसाठा, सोन्याचे दागिने, रोकड, वाहने, अमली पदार्थ आदींचा समावेश असल्याची माहिती परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांनी दिली.
कराळे यांनी सांगितले की, आचारसंहिता लागू झाल्यापासून परिक्षेत्रात ६ कोटी ५३ लाख रुपयांची राेकड जप्त केली आहे. वाहन तपासणीदरम्यान, ही बेहिशेबी रोकड आढळून आली. तसेच ५ कोटी ७५ लाख रुपयांचा अवैध मद्यसाठा, २ कोटी ६७ लाख रुपयांचा गांजा, अमली पदार्थांचा साठा, ३४ लाख रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने व प्रलोभन वस्तू असा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. नाकाबंदी व गस्ती दरम्यान, अहिल्यानगर जिल्ह्यात एकाच कारवाईत २३ कोटी ७२ लाख रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने व जळगाव जिल्ह्यात १ कोटी ४५ लाख रुपयांची रोकड पोलिसांनी जप्त केली आहे, तर धुळे जिल्ह्यात गांजाची शेती पोलिसांनी उघडकीस आणून संबंधितावर कारवाई केली आहे. तसेच नाशिक ग्रामीण भागात २० लाख ३४ हजार रुपयांचा गांजा वाहतूक पोलिसांनी रोखला. परिक्षेत्रात निवडणुकीदरम्यान, कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांनी जिल्हानिहाय पोलिस बंदोबस्ताचे नियोजन केले आहे. तसेच केंद्रीय पोलिस दलाच्या ८४ तुकड्या परिक्षेत्रात असून, त्यांचीही आवश्यकतेनुसार नेमणुका करण्यात आल्या आहेत. निवडणुकीच्या वेळी पोलिसांनाही मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी पोस्टल बॅलेटची व्यवस्था करण्यता आल्याची माहिती कराळे यांनी दिली.
नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार व अहिल्यानगर जिल्ह्यांच्या सीमांवर गुजरात व मध्य प्रदेश राज्य आहेत. त्यामुळे राज्याच्या सीमावर्ती भागात ३८ चेक पोस्ट व ३४ मिरर चेक पोस्ट उभारण्यात आले आहेत. त्यामुळे आंतरराज्य वाहतुकीवर पोलिसांनी लक्ष केंद्रित केले असून, वाहन तपासणीत पोलिसांनी २ कोटी १० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच आंतरराज्य पोलिसांशी समन्वय साधून गुन्हेगारांच्या माहितीची आदानप्रदान करीत त्यांची तपासणी मोहीम राबवण्यात आली. त्यातून काही गुन्हेगारांची धरपकड करण्यात आली.
नाशिक ग्रामीणसह धुळे, जळगाव, नंदुरबार व धुळे जिल्ह्यांत ग्रामीण पोलिसांनी २६४ भरारी पथके तयार केली आहेत. गुन्हेगारांकडून पोलिसांनी ५२ गावठी कट्टे, ८९ जिवंत काडतुसे, १५३ धारदार शस्त्रे असा शस्त्रसाठा जप्त केला आहे. तसेच पाचही जिल्ह्यांतील १६ हजार ८९१ सराईत गुन्हेगार व टवाळखोरांवर प्रतिबंधात्मक कारवाया केल्या आहेत. एमपीडीए अंतर्गत १२ गुन्हेगारांना कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे, तर १२३ गुन्हेगारांना तडीपार करण्यात आले आहे.
निवडणुका निर्भय व मुक्त वातावरणात होण्यासाठी पोलिसांनी बंदाेबस्तासह प्रतिबंधात्मक कारवाया सुरू केल्या आहेत. प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा नियंत्रण कक्ष, जिल्हा अधीक्षक, पोलिस ठाणे प्रभारी यांच्यासमवेत नागरिकांनी थेट संवाद, संपर्क साधून त्यांना येणाऱ्या अडचणी सांगाव्यात. जास्तीत जास्त नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावावा.
दत्तात्रय कराळे, विशेष पोलिस महानिरीक्षक, नाशिक परिक्षेत्र