फलटण : फलटण-कोरेगाव विधानसभा निवडणुकीची मतमोजणी शनिवार दि. 23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वा. फलटण येथील शासकीय धान्य गोदाम येथे होणार आहे. यासाठीची जय्यत तयारी झाली असून मतमोजणी प्रक्रिया पार पाडण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. मतमोजणीच्या सुरुवातीला पोस्टल मते मोजली जाणार आहेत. त्यानंतर 14 टेबलवर ईव्हीएम मतांची मोजणी 26 फेर्यात होणार आहे. तर पोस्टल मतमोजणीसाठी 10 टेबल, इटीपीबीएस मतमोजणीसाठी 5 टेबल अशा 29 टेबलवर मतमोजणी होणार आहे. मतमोजणीसाठी एकूण 250 कर्मचार्यांची नियुक्ती केली असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी दिली.
फलटण-कोरेगाव मतदार संघामध्ये 1 लाख 26 हजार 364 पुरुष, 1 लाख 15 हजार 004 स्त्री व 08 इतर मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. एकूण 2 लाख 41 हजार 376 एवढे मतदान झाले. मतमोजणीस कडेकोट बंदोबस्तात उद्या सकाळी 8 वा. सुरुवात होणार आहे. ईव्हीएम मशीन वरील मतमोजणीच्या एकूण 26 फेर्या होणार आहेत. प्रत्येक फेरीत 14 मतदान केंद्रांची मतमोजणी होणार आहे. पहिल्या फेरीत 1 ते 14, दुसर्या फेरीत 15 ते 28 अशा पद्धतीने एकूण 26 फेर्यात 355 केंद्रांची मतमोजणी होणार आहे. 26 वी फेरी 5 मतदान केंद्राची असेल. प्रत्येक फेरी पूर्ण झाल्यानंतर लगेचच फेरीचा निकाल घोषित केला जाणार आहे.
मतमोजणीच्या वेळी सर्व पक्षांचे उमेदवार आणि अपक्ष आपापल्या मतमोजणी प्रतिनिधी आणि निवडणूक प्रतिनिधींची मतमोजणीच्या ठिकाणी सभागृहात उपस्थिती असते. मतमोजणीसाठी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार डॉ. अभिजीत जाधव, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी मुख्याधिकारी निखिल मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली मतमोजणीचे प्रभावी नियोजन करण्यात आले आहे.
फलटण-कोरेगाव विधानसभेची निवडणूक अत्यंत चुरशीची झाली असून, दोन्ही राष्ट्रवादीच्या उमेदवारांच्या समर्थकांनी आपल्याच उमेदवाराचा विजय होणार असल्याचा दावा केला आहे. तर नेतेमंडळी गावोगावची आकडेवारी घेऊन गणिते मांडून आपला उमेदवार किती मतांनी निवडून येईल हे समर्थकांना सांगत आहेत. काहीही झालं तरी सध्या मतदारांनी दिलेला कौल मतपेटीत बंद असून, उद्या सकाळी नऊ वाजेपर्यंत पहिल्या फेरीचा निकाल बाहेर येण्याची शक्यता आहे. दुपारी तीन वाजेपर्यंत संपूर्ण कल समजून येईल. समर्थक कार्यकर्त्यांची चांगलीच घालमेल सुरू असून, उमेदवार व नेतेमंडळीची धाकधूक वाढली आहे.