

छत्रपती संभाजीनगर: महायुतीचा मुख्यमंत्री कोण? याबाबत पक्षश्रेष्ठीच निर्णय घेतील अन् मंत्रिमंडळात कोण कोण मंत्री असतील त्याबाबत मुख्यमंत्री निर्णय घेतील. त्यामुळे अगोदर मुख्यमंत्री ठरू द्या, असे माजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले.
ईव्हीएममध्ये कुठल्याही प्रकारची छेडछाड शक्य नसून, विरोधकांनी आता रडीचा डाव बंद करावा, असा टोलाही त्यांनी लगावला. एका लग्न समारंभानिमित्ताने ते छत्रपती संभाजीनगर शहरात आले होते ते म्हणाले, मुख्यमंत्री कोण? याचा निर्णय पक्षश्रेष्ठी करणार आहेत. तिन्ही पक्षांचे नेते मिळून या पक्षश्रेष्ठींशी संवाद साधत आहोत. दरम्यान, अनेक आमदारांचे लक्ष मंत्री पदाकडे असल्याचा सवाल उपस्थित केला असता. ते म्हणाले अगोदर मुख्यमंत्री ठरतील, त्यानंतर मंत्री कोण असतील, याचा निर्णय मुख्यमंत्रीच घेतील. त्यामुळे मुख्यमंत्री ठरू द्या, असे ते म्हणाले.
मनपाबाबत लवकरच निर्णय महापालिकांच्या आगामी निवडणुका स्वबळावर लढायच्या की, महायुतीमध्ये, याबाबत तिन्ही पक्षांचे नेते एकत्र बसून निर्णय घेतील. त्याला अजून वेळ आहे, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
महाविकास आघाडी ईव्हीएमविरोधात आंदोलनाच्या तयारीत आहे, यावर फडणवीस म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाने दोन दिवसांपूर्वीच विरोधकांना सांगितले की, विजय मिळाला की ईव्हीएम चांगले अन् पराभव झाला की, ईव्हीएममध्ये घोळ ही पद्धत बंद करा. त्यामुळे ईव्हीएम हे टेम्परप्रूफ असून, त्यात छेडछाड शक्य नसल्याचेही त्यांनी सांगितले.