'मविआ'चे महायुतीसमोर आव्हान !

लोकसभेची जागा जिंकल्यानंतर महाविकास आघाडीच्या आशा पल्लवित
Assembly election 2024
'मविआ'चे महायुतीसमोर आव्हान !File Photo
Published on
Updated on

नगर जिल्ह्यातील शिडीं लोकसभेची जागा जिंकल्यानंतर महाविकास आघाडीच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत अकोले व संगमनेर वगळता इतर चार मतदार संघांत महायुतीचे पारडे जड असल्याचे आकडे लोकसभा निवडणूक निकालातून समोर आले. सहापैकी चार विधानसभा मतदार संघांत महायुतीला मताधिक्य दिसत असले, तरी २०१९च्या तुलनेत ते कमालीचे घटल्याने महाविकास आघाडीची सुपरफास्ट गाडी रोखण्याचे आव्हान महायुतीसमोर आहे. महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या विरोधात कोण लढणार, हा प्रश्न आहे. कोपरगावात पारंपरिक राजकीय प्रतिस्पधी काळे कोल्हे आज महायुतीचे घटक असले, तरी कोल्हे बंडाचे निशाण फडकावण्याची तयारी करतअसल्याने या मतदार संघाकडेही राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून आहे.

संगमनेर व शिर्डी विधानसभा मतदारसंघ हे अनुक्रमे थोरात, विखे-पाटील यांचे बालेकिल्ले मानले जातात. १९८५च्या निवडणुकीत अपक्ष म्हणून बाळासाहेब थोरात यांनी संगमनेरची आमदारकी पटकावलो. पुढे ते कॉंग्रेसमध्ये गेले. तेव्हापासून आजपर्यंत या मतदार संघावर त्यांचे वर्चस्व आहे. आता त्यांच्या विरोधात विधानसभा लढण्याचे संकेत सुजय विखे-पाटील यांनी दिले आहेत. डॉ. सुजय हे खरेच आ. थोरातांविरोधात लढणार की फक्त वातावरण निर्मिती करत आहेत, याबाबत उलटसुलट चर्चा आहे. मंत्री विखे- पाटील यांचा शिर्डी हा बालेकिल्ला मानला जातो. १९९५ पासून विखे-पाटील हे शिर्डीचे सलगपणे प्रतिनिधित्व करत आहेत. थोरात व विखे-पाटील हे पूर्वी एकाच पक्षात होते. विखे-पाटील भाजपत गेले. दोघांचे पक्ष वेगवेगळे झाल्यानंतर ही पहिलीच विधानसभेची निवडणूक होत आहे (१९९९चा अपवाद : यावेळी विखे शिवसेनेत होते), त्यामुळेच विखे-थोरात यांच्या विरोधात कोण लढणार, याकडे नगरच नव्हे तर राज्याचे लक्ष लागणार आहे.

डॉ. सुजय विखे-पाटील हे संगमनेरात थोरातांविरोधात लढले, तर थोरातही तोलामोलाचाउमेदवार शिर्डीत मंत्री विखे-पाटील यांच्या बिरोधात उतरवतील, अशी अटकळ बांधली जात आहे. मात्र, हा उमेदवार पक्षातील की आयात, या प्रश्नाचे उत्तर आजतरी गुलदस्त्यात आहे. श्रीरामपूर शिवसेनेकडे, तर नेवासाविधानसभा मतदारसंघ भाजपकडे आहे. मात्र, या दोन्ही जागांवर शिंदे सेनेने दावा ठोकला आहे. गतवेळी पराभूत झालेले माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, माजी खासदार सदाशिव लोखंडे यांचे चिरंजीव प्रशांत हे श्रीरामपुरातून शिंदे सेनेकडून इच्छुक आहेत. नेवाशात शिंदे सेनेने उमेदवार हेरल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. श्रीरामपुरात काँग्रेसमध्ये गटबाजी उफाळून आली असून, विद्यमान आमदार लह कानडे यांच्या विरोधात दुसऱ्या गटाने उघडपणे दंड थोपटले आहे. त्याचा फायदा महायुतीला होणार असला तरी महायुती त्याचा लाभ कसा उठविणार? हेअजूनही ठरल्याचे दिसत नाही. पक्षांतर्गत गटबाजीमुळे उमेदवार देताना महाविकास आघाडीची (काँग्रेस) सर्कस पाहावयास मिळू शकते. नेवाशात उद्धव ठाकरे यांचे शिलेदार, विद्यमान आमदार शंकरराव गडाख यांची उमेदवारी निश्चित असून त्यांनी प्रचाराची पहिली फेरी पूर्ण करत आघाडी घेतल्याचे दिसते.

कोपरगावात काळे व कोल्हे हे कट्टर राजकीय विरोधक. मात्र आता दोघेही महायुतीत आहेत. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार आशुतोष काळे यांची उमेदवारी निश्चित मानली जात असली, तरी कोल्हे त्यांच्या विरोधात विधानसभा लढण्याची तयारी करत आहे. कोपरगावात काळे-कोल्हेंची मैत्रीपूर्ण लढत होणार की महाविकास आघाडीत प्रवेश करून कोल्हे धक्का देणार? यावर कोपरगावची राजकीय समीकरणे अवलंबून आहेत. गतवेळी केवळ ८२२ मतांनी आशुतोष काळेंकडून पराभव झाल्याचे शल्य कोल्हे यांना आहे. त्याची परतफेड करण्याकरिता विवेक कोल्हे यांनी कोपरगावात मोट बांधली आहे. आता फक्त कोल्हे अपक्ष, की एखाद्या पक्षाकडून लढणार? तेव्हा त्यांचा पक्ष कोणता असेल, इतकेच ठरणे बाकी आहे.

अकोले मतदार संघात २०१९मध्ये भाजपच्या वैभव पिचड यांचा पराभव करत राष्ट्रवादीचे डॉ. किरण लहामटे पहिल्यांदाच आमदार झाले. राष्ट्रवादीतील फुटीनंतर ते अजित पवारांसोबत गेले. या जागेवर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा दावा असला, तरी पिचड काय भूमिका घेणार? याकडे अनेकांच्या नजरा लागून आहेत. येथून शरद पवारांनी जिल्हा बँकेचे संचालक अमित भांगरे यांच्यासारखा नवखा चेहरा हेरून ठेवला आहे. त्यामुळे अकोल्याची लढत दुरंगी की तिरंगी? याची उत्सुकता कायम आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news