पाणीप्रश्नी शेतकर्‍यांचे पाटबंधारेसमोर धरणे

पाणीप्रश्नी शेतकर्‍यांचे पाटबंधारेसमोर धरणे

श्रीरामपूर : पुढारी वृत्तसेवा : भंडारदरा धरणातून शेतीसाठी सोडलेल्या आवर्तनातून भरणे राहिलेल्या संतप्त शेतकर्‍यांनी मंगळवारी आ. लहू कानडे यांचे मार्गदर्शनात व माजी नगरसेवक अशोक कानडे यांच्या नेतृत्वाखाली पाटबंधारे कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. दरम्यान, उर्ववरीत भरणे काढण्यासह पिण्याच्या पाण्यासाठी गावतळी भरून देवू, असे ठाम आश्वासन अधिकार्‍यांनी दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

भंडारदरा धरणातून सध्या शेतीसाठी आवर्तन सोडले आहे. या आवर्तनात कमी दाबाने चार्‍यांना पाणी सोडल्याने अनेक शेतकर्‍यांचे भरणे राहिल्याच्या तक्रारी येत आहेत. धरणाचे पाणी बंद झाल्यामुळे आता काय होणार, या चिंताजनक तक्रारी शेतकर्‍यांनी केल्याने आ. कानडे यांनी पाटबंधारे वरीष्ठ अधिकार्‍यांना पत्राद्वारे अधिक दाबाने पाणी सोडण्याच्या सूचना केल्या होत्या, मात्र यानंतरही अनेक शेतकर्‍यांचे भरणे अपूर्ण राहिले. आवर्तन बंद होत असल्याचे समजल्याने माजी नगरसेवक अशोक कानडे यांच्या नेतृत्वाखाली शेतकर्‍यांनी थेट पाटबंधारे विभागाच्या कार्यालयात धरणे आंदोलन केले.आवर्तन सोडल्यानंतर नियोजनाचा अभाव असल्याने पाण्याची वितरण व्यवस्था कोलमडली. अनेक शेतकर्‍यांची भरणे अपूर्ण राहिली. तालुक्यातील सुमारे 300 हेक्टर क्षेत्र भरण्यापासून वंचित राहिले आहे.

अधिकार्‍यांनी वस्तुस्थिती झाकून ठेवल्याने पाण्याची खरी आकडेवारी बाहेर आली नाही. कमी दाबाने पाणी मिळाल्याने शेतकरी पाण्यापासून वंचित राहिले. या आवर्तनातून संपूर्ण शेतकर्‍यांचे भरणे काढून द्यावे, पिण्याच्या पाण्यासाठी योजनांचे गावतळे तातडीने भरून द्यावे, अशा मागण्या करुन, कार्यालयातून हलणार नसल्याची ठाम भूमिका अशोक (नाना) कानडे व शेतकर्‍यांनी घेतली. यामुळे अधिकार्‍यांची चांगलीच धांदल उडाली.

पाटबंधारेचे कार्यकारी अभियंता स्वप्निल काळे व वडाळा उप विभागाचे उप अभियंता कल्हापूरे अ.नगर येथे बैठकीस गेल्याने अधिकारी श्रीमती कुर्‍हाडे यांनी काळे व कल्हापूरे यांच्याशी संपर्क साधून या आंदोलनाची माहिती दिली. अधिकार्‍यांनी कानडेंसह शेतकर्‍यांशी दूरध्वनीवरून संवाद साधला. तक्रारी समजून घेत, पूर्ण क्षमतेने डी वाय 15 व त्यावरील भरण्याचे नियोजन करीत आहे. खोकर, मातापूर आदी गावातील भरणे शिल्लक राहणार नाही, असे आश्वासन दिले. यावेळी डॉ. नितीन आसने, हरिभाऊ बनसोडे, सुरेश पवार, सरपंच सागर मुठे, अजिंक्य उंडे, राजेंद्र औताडे, रमेश आव्हाड, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष शिवाजी पवार, निखिल कांबळे, श्याम आसने, शरद जासूद,गणेश गोसावी, रवींद्र मुठे, संभाजी बनसोडे, दत्तात्रय मुठे, संतोष मुठे, बाबासाहेब कासार, बापूसाहेब आढाव, नितीन उंडे यांच्यासह सुमारे 300 शेतकरी या आंदोलनात सहभागी झाले होते.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news