

नगरः पुढारी वृत्तसेवा
रोटरी क्लब ऑफ अहमदनगर प्रियदर्शिनी, कॅन्सर पेशंट्स ऐड असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने ९ ते १८ वयोगटातील १ हजार गरजू मुलींसाठी मोफत गर्भाशयमुख कर्करोग प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे.
सारडा कॉलेज येथून गुरूवारी त्याची सुरूवात झाली. गर्भाशयमुख कर्करोग हा महिलांमध्ये आढळणारा एक प्रमुख कर्करोग असून, योग्य वेळी प्रतिबंधात्मक लसीकरण केल्यास तो पूर्णतः टाळता येऊ शकतो.
लस ही गर्भाशयमुख कर्करोगापासून संरक्षण करणारी प्रभावी लस आहे. ही लस मुलींना त्यांच्या बालपणी दिल्यास भविष्यातील कर्करोगाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात कमी होते. रोटरी क्लब ऑफ अहमदनगर प्रियदर्शिनी च्या माध्यमातून १००० गरजू मुलींना मोफत लसीकरण करून त्यांच्या सुरक्षित भविष्यासाठी मोठा योगदान देण्यात येत आहे.
लसीकरणासाठी मुलींना पूर्व नोंदणी करणे आवश्यक असून पूर्व नोंदणी केल्याशिवाय लसीकरण दिले जाणार नसल्याचे आयोजकांनी सांगितले. लसीकरण पूर्व नोंदणी अर्ज कापड बाजारातील सिमरतमल कुंदनमल ज्वेलर्स येथे उपलब्ध असून भरलेले अर्ज तेथेच जमा करावयाचे आहेत. नगर शहरातील विविध शाळेत स्त्रीरोग तज्ञ डॉ स्मिता तारडे यांचे मार्गदर्शन आयोजित करण्यात आले आहे.
मुलींना सुरक्षित व निरोगी भविष्य देण्यासाठी ही मोहीम महत्त्वाची आहे. आजचा एक छोटा प्रयत्न आपल्या मुलीला कर्करोगापासून मुक्त करू शकतो.
मीनल बोरा, अध्यक्षा, रोटरी क्लब