

अकोले : पुढारी वृत्तसेवा
पर्यटक स्थळ असलेल्या भंडारदरा धरणातून पाणी सोडण्यात आल्याने अंब्रेला धबधबा प्रवाहित झाला आहे. धबधब्याचे विहंगम दृश्य पाहण्यासाठी पर्यटक गर्दी करत आहेत. तर भंडारदरा धरणात ६ हजार १३ दशलक्ष घनफुट पाणी साठा शिल्लक आहे. (Umbrella Waterfalls)
उत्तर अहमदनगर जिल्ह्याची जीवनरेखा असलेल्या भंडारदरा धरणामधुन पाणी सोडण्यात आले आहे. हे पाणी निळवंडे धरणाचा पाणीसाठा नियंत्रित ठेवण्यासाठी सोडण्यात आले आहे. भंडारदरा धरणाच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांसाठी निळवंडे धरणातून पिण्यासाठी व शेतीसाठी आवर्तन सोडण्यात आलेले आहे. तसेच भंडारदरा धरणातून वीज निर्माण केंद्रातून ८५० क्युसेस तर अम्ब्रेला धबधब्यामधून ५०० क्युसेस असे एकूण १३५० क्युसेसने विसर्ग प्रवरा नदीपात्रात वाहत आहे.
भंडारदरा धरणातून सोडण्यात आलेलं पाणी साधारणतः दहा ते बारा दिवस सुरू राहणार आहे. त्यामुळे अम्ब्रेला धबधब्याचे दर्शन होणार असून, विकएंडच्या सुट्टीचा आनंद घेणाऱ्या पर्यटकांना अंब्रेलाच्या विहंगम दृश्यांचा नजारा बघावयास मिळणार आहे. तर उन्हाळ्याची सुट्टी लागणार असल्याने पर्यटनाच्या दृष्टीने अम्ब्रेला धबधबा हा कायमस्वरूपी आवर्तन सोडताना सुरू राहावा अशी मागणी पर्यटकाबरोबरच भंडारदरा परिसरातील व्यापारी व नागरिकांनी केली आहे. त्यामुळे भंडारद-याच्या पर्यटनामध्ये वाढ होऊन हा धबधबा बघण्यासाठी पर्यटकांची पावले भंडारद-याकडे वळणार आहेत. अम्ब्रेला धबधब्यातून पाणी वाहू लागल्यामुळे पर्यटकही भंडारदरा धरणाच्या बगीच्यात गर्दी करू लागले आहेत.