राहुरी : पुढारी वृत्तसेवा
राहुरी वन विभागातील अनागोंदी कारभार चांगलाच चव्हाट्यावर आला आहे. एकीकडे बिबट हल्ले वाढत असताना दुसरीकडे अवैध वृक्षतोडीचे थैमान वाढले आहे. रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होऊन शेकडो वृक्षांचे लाकूड वखारीच्या दारी पोहचवले जात आहे.
'वृक्षवल्ली आम्हा सोयरे' असा नारा देत लोकांना झाडे लावा, झाडे जगवा, असे आवाहन करणारा वन विभाग रात्री मात्र झोपी जात आहे. मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होऊन वखारीवाल्यांना वृक्ष विकणाऱ्यांची मोठी टोळी कार्यरत झाली आहे.
परंतु वृक्षतोडीकडे उघड डोळ्याने पाहूनही सर्वकाही अलबेल असल्याचे दर्शविणाऱ्या वन विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. राहुरी तालुक्यात दैनंदिन शेकडो झाडांची कत्तल केली जात आहे.
हिरवाईने नटलेल्या जमीनींना उजाड करण्याचे काम लाकूड तस्करांकडून केले जात आहे. लोकांना झाडे लावण्यास प्रवृत्त करण्याऐवजी राहुरी भागात वृक्षतोडीला प्रोत्साहीत वातावरण निर्मिती केली जात असल्याने अनेक जंगले नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत.
बारागाव नांदूर, कुरणवाडी, डिग्रस, वांबोरी, गुहा, कणगर, वडनेर, निंभेरे, चिंचाळे, आरडगाव, मानोरी, वळण आदी भागात असलेली जंगले सुपडा साफ करण्याचे काम सुरू आहे. दैनंदिन शेकडो वाहने विनापरवाना वृक्षतोडी करून तोडलेली लाकडे घेऊन वखारींकडे येत असतात.
मुळा धरणाच्या कुशीत मोठ्या प्रमाणात असलेली वनराई तर लाकूड तोडणाऱ्यांसाठी एकप्रकारे पर्वणीच ठरत आहे. २० ते ३० वर्षांपासून हिरवाई पांघरलेली शेकडो झाडांची राजरोसपणे कत्तल केली जात आहे.
अनेक व्यावसायिकांकडे वनविभागाचा कोणताही परवाना नसताना बेफाम होऊन वृक्षतोडीचा बंदा काहींनी सुरू केलेला आहे. याबाबत काही सामाजिक कार्यकत्यांनी अनेकदा वन विभागाकडे अवैध वृक्षतोडी संदर्भात पाठपुरावाही केला.
मात्र याकडे त्यांचे लक्ष नसून केवळ मर्जी सांभाळणाऱ्यांना सहकार्य करण्याची भूमिका वन विभागाकडून घेतली जात असल्याची चर्चा आहे. यामुळे राहुरी विभागात कार्यरत असलेले वनपाल पाचारणे यांच्या वादग्रस्त कारभाराची चौकशी व्हावी अशी मागणी होत आहे.