नेवासा : पुढारी वृत्तसेवा
सततच्या पावसाने घाट प्रकल्पातील सातशे फुटांच्या जलबंधाऱ्यातील जलसाठा संथगतीने वाहता झाल्याने शनिशिंगणापुरातील पानसतीर्थ सुशोभीकरण प्रकल्पाचे सौंदर्य खुलले आहे. येथील सप्ततीर्थ नद्या प्रतिकृती घाट, शनिस्तंभ, भक्तीमार्गातील पाषाणी सौंदर्य आणखी फुलून निघाले.
देव आहे, पण मंदिर नाही. घरे आहेत, पण त्यास दारे नाहीत, अशी जगभर ख्याती असलेल्या शनिशिंगणापूर येथील पानसतीर्थ सुशोभीकरण प्रकल्पाचे काम पूर्णत्वास गेले आहे. हा प्रकल्प आता शनिभक्तांचे आकर्षण ठरत आहे. पुरातन वास्तूशैलीला आता पावसाळ्यातील हिरवाईचा, नितळ जलाचा साज चढला. यंदा पावसाने सरासरी ओलांडल्याने शनिशिंगणापुरातील हा प्रकल्प भाविकांसाठी सेल्फी पॉईंट ठरत आहे.
सध्या नयनरम्य असे वातावरण या प्रकल्प परिसरात आहे. शनिभक्त दर्शनाला येताना व जाताना येथे रमताना दिसत आहेत. गंगा, यमुनेसह सात नद्यांची प्रतिकृती बनविण्यात आली. तिथे खाली जलाशय नितळ झाला आहे. दोहोबाजूंना वृक्षवल्ली, संथ वाहणारा जलाशय, घाटाच्या दुतर्फ असलेले पाषाणी स्तंभ, यामुळे शनिमंदिर प्रांगण निसगनि नटले.