Sharadiya Navratri | मोहटा गडावर नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी
पाथर्डी तालुका : पुढारी वृत्तसेवा
अवघ्या १० दिवसांवर येऊन ठेपलेल्या शारदीय नवरात्र महोत्सवानिमित्त श्री क्षेत्र मोहटादेवी गडावर नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी सुरू झाली आहे. रस्ते, रंगरंगोटी, दर्शन बारीतील रेलिंग दुरुस्ती, मंडप उभारणीची कामे जोरात सुरू आहेत.
३ ते १६ ऑक्टोबरदरम्यान घटस्थापना ते कोजागरी पौर्णिमा या कालावधीत शारदीय नवरात्रोत्सव होत आहे. या दरम्यान होणारे सर्व धार्मिक कार्यक्रम, तसेच विधी उत्साहपूर्ण वातावरणात साजरे करण्यात येतात.
मोहटा देवीच्या दर्शनासाठी राज्याच्या विविध भागांतून लाखो देवीभक्त नवरात्र काळात दर्शनासाठी येतात. या भाविकांच्या सोयी-सुविधांसाठी देवस्थान समितीने प्राथमिक गरजा पुरवण्यासाठी कामकाजाला सुरुवात केली आहे. गर्भगिरीच्या डोंगररांगेत मोहटा देवीचे स्वयंभू स्थान असून, यंदा चांगला पाऊस झाल्याने मंदिर व आसपासचा परिसर हिरवाईने नटला आहे.
गडावर येणाऱ्या प्रत्येक भाविकाला अडचण येणार नाही यासाठी सुलभ दर्शन बारी, पाणी, शौचालय, पार्किंग, निवारा, महाप्रसाद याची कामे देवस्थान समितीकडून युद्ध पातळीवर सुरू आहेत. वन विभागाकडून मोहटा देवस्थानला मंदिर परिसराची मोठी जागा हस्तांतरित झाल्याने मंदिर परिसरातील रस्त्यांचे रुंदीकरण करण्यात येत आहे.
गडावर सुमारे दोन हजार दुचाकी मोटरसायकल एकाच वेळी पार्किंग करता येणार आहे. त्यामुळे भाविकांना पायी जाण्यासाठीचे मोठे अंतर कमी होऊन कमी श्रमात देवीचे दर्शन घेता येणार आहे. सध्या मंदिर परिसरातील हनुमान मंदिरापासून पायऱ्यांचे काम, रस्त्यांवरील खड्डे बुजवणे, पार्किंगसाठी जागा, रस्ते रुंदीकरणाबरोबरच रंगरंगोटी, दर्शन वारीतील रेलिंग दुरुस्ती, मंडप उभारणीची कामे जोरात सुरू आहेत.
रस्ताकामाच्या वादात प्रवाशांचे हाल
राष्ट्रीय महामार्ग रस्त्यावरील तनपुरवाडी फाटा ते आयटीआय कॉलेज बीड-पाथर्डी या राज्यमार्गदरम्यानच्या सुमारे दीड किलोमीटरहून अधिक रस्त्याची दुरवस्था अनेक वर्षांपासून आहे. या रस्त्याबाबत अनेक बैठका झाल्या.
रस्ता करावा अशी मागणी झाली. मात्र, हा रस्ता कोणत्या विभागाचा आहे हेच कळायला मार्ग नाही. रस्त्याचे रेकॉर्ड उपलब्ध नसल्यामुळे रस्ता कोणी करायचा असा प्रश्न पडला आहे. त्यामुळे या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्यांना रस्त्याच्या दुरवस्थेचा सामना करावा लागत आहे.
श्री यंत्रावर आधारित राज्यात एकमेव मंदिर !
मोहटा देवीचे हे स्थान स्वयंभू असून, साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र माहुरच्या रेणुका मातेचे उपपीठ म्हणून मोहटा देवस्थानची ख्याती आहे. माहूरच्या रेणुका मातेचे अंशात्मक पीठ मोहटादेवीचं आहे.
देवी भक्तांच्या भक्तीला पावन होऊन देवी मोहटादेवी गडावर प्रकट झाल्याची आख्यायिका आहे. हे मंदिर श्री यंत्र आकारावर आधारित असून, मंदिरामध्ये चौसष्ट योगिनी, अष्टभैरव, दश महाविद्याच्या मूर्ती, श्री यंत्राकार दर्शन रांगेत स्थापित आहे. असे देवीचे स्थान राज्यात एकमेव आहे.
नवरात्र काळात देवी भक्तांच्या सुरक्षेच्या दृष्टीने मंदिर व परिसरात अद्ययावत सीसीटीव्ही कॅमेरे, पोलिस दल, खासगी व देवस्थानचे सुरक्षारक्षक, प्रथमोपचार, आपत्ती व्यवस्थापन, निवारा, पाणी याची मुबलक प्रमाणात व्यवस्था करण्यात आली आहे. त्याबरोबरच दर्शन बारीतही भाविकांना लागणाऱ्या सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. एनडीआरएफचे प्रशिक्षण घेतलेले जवान, स्वच्छता कर्मचारी व स्वयंसेवक नवरात्रीसाठी तैनात असणार आहेत.
सुरेश भणगे, मुख्य कार्यकारी अधिकारी, मोहटादेवी देवस्थान