

रस्त्यात गाडी लावून दारू पीत असलेल्या इसमास बाजूला व्हा, आमचा ट्रॅक्टर जाऊ दे, असे सांगितल्याचा राग येऊन त्यातून झालेल्या वादविवादात एका 55 वर्षीय शेतकर्यांच्या अंगावर चार ते पाच वेळेस कार घालून त्याचा खून केल्याची धक्कादायक घटना कोपरगाव तालुक्यातील धोत्रे शिवारात घडली आहे. राऊसाहेब पुंजाबा गागरे (वय 55 वर्षे रा धोत्रे) असे मयत शेतकर्याचे नाव असून, याप्रकरणी अमोल बळीराम शिंदे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांकडुन मिळालेली माहिती अशी की, दि. 17 ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास प्रवीण रावसाहेब गागरे व त्यांचे वडील राऊसाहेब पुंजाबा गागरे हे पिता पूत्र आपल्या शेतातून ट्रॅक्टरमध्ये बसून घरी येत होते. त्यावेळी अमोल बळीराम शिंदे हा त्याच्या मित्रांसोबत रस्त्यावर गाडी लावून दारू पीत होता. गागरे पिता पुत्रांनी अमोल शिंदे यास रस्तातुन बाजूला हो, आमचा ट्रॅक्टर जाऊ दे असे सांगितले. मात्र त्याचा राग आल्याने शिंदे याने गागरे पिता-पुत्रांसमवेत भांडण केले.
त्यानंतर गागरे पिता पूत्र हे घरी गेल्यानंतर अमोल शिंदे याने राऊसाहेब गागरे यांना फोनवरून शिवीगाळ केली. यावेळी गागरे यांनी तुझ्या विरोधात पोलिस ठाण्यात तक्रार करतो असे सांगितले.अमोल शिंदे यांच्या विरुद्ध पोलिस स्टेशनला तक्रार देण्यासाठी प्रवीण गागरे, प्रशांत गागारे व त्यांचे वडील राऊसाहेब गागरे हे रात्री आठ वाजेच्या सुमारास धोत्रे खोपडी रोडवर 15 नं. चारी रस्त्याने जात असताना अमोल शिंदे याने त्यांच्या कडील कारने गागरे यांच्या मोटर सायकलला पाठीमागून जोराची धडक दिली. त्यात दुचाकीवरील प्रवीण गागरे, प्रशांत गागरे व त्यांचे वडील राऊसाहेब पुंजाबा गागरे खाली पडले.
याच वेळी अमोल शिंदे याने रावसाहेब गागरे यांच्या अंगावरून दोन-तीन वेळेस कार मागेपुढे घेऊन गाडी अंगावर घालून त्यांचा खून केला, तर दोन्ही मुलांनाही जखमी केल्याची फिर्याद दिली आहे. घटनास्थळावरून आरोपी फरार झाला होता व सध्या त्याच्या डोक्यास मार लागल्याने त्याला उपचारकामी घाटी हॉस्पिटल छत्रपती संभाजीनगर येथे दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्यास डिस्चार्ज मिळताच त्याला अटक करण्यात येणार असल्याची माहिती पोलिस निरीक्षक संदिप कोळी यांनी दिली आहे. या प्रकरणी प्रवीण रावसाहेब गागरे यांचा फिर्यादीवरून अमोल बळीराम शिंदे यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलिस निरीक्षक संदिप कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका पोलिस करत आहे.