राहुरीत गावठी पिस्तूल विके्रत्यांना पकडले; आरोपींकडून गांजाही जप्त

राहुरीत गावठी पिस्तूल विके्रत्यांना पकडले; आरोपींकडून गांजाही जप्त

राहुरी : पुढारी वृत्तसेवा : राहुरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या पथकाने धडाकेबाज कारवाई करीत गावठी पिस्तूल (कट्टे) विकणार्‍या दोघांना गजाआड केले. दोन्ही आरोपी सराईत गुन्हेगार असल्याची माहिती मिळाली असून पोलिसांनी मोपेड दुचाकीसह देशी बनावटीचे पिस्तूल, 3 काडतूस व डिक्कीमध्ये लपविलेला सुमारे दीड किलो गांजा जप्त केला. पोलिस ठाणे हद्दीत गावठी कट्टा विक्रेत्यांची टोळी दाखल होणार आहे. त्याबाबत पोलिस अधिकार्‍यांच्या आदेशानुसार उपनिरीक्षक चारूदत्त खोंडे, पोलिस हवालदार सूरज गायकवाड, राहुल यादव, विकास साळवे, नदीम शेख, प्रमोद ढाकणे, प्रवीण अहिरे, प्रवीण बागूल, गोवर्धन कदम, अजिनाथ पाखरे यांच्या पथकाने 19 जानेवारी रोजी सकाळीच सापळा लावला होता.

मिळालेल्या माहितीनुसार दोन जण मोपेड दुचाकीवर आलेल्या संशयितांवर सिनेस्टाईल धाड टाकत आरोपींना घेरण्यात आले. चौकशीमध्ये आरोपी जॉन कॅसिनो परेरा व अब्दुल वाहिद सय्यद शब्बीर (दोघे रा. अहमदनगर) यांची झडती केली असता, त्यांकडे देशी बनावटीचे पिस्तूल, तीन जिवंत काडतूस, तसेच मोपेड दुचाकीच्या (एमएच 16 डीएच 5613) डिक्कीत लपवून ठेवलेला 1 किलो 440 ग्रॅम वजनाचा गांजा सापडला. पोलिसांनी तत्काळ 1 लक्ष 4 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करीत आरोपींवर कारवाई केली. पकडलेल्या आरोपींवर राहुरी पोलिस ठाण्यात घातक शस्त्र बाळगणे, तसेच अंमली पदार्थ तस्करीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही आरोपींवर यापूर्वी कोतवाली पोलिस ठाण्यात दोन गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

राहुरी परिसरामध्ये गुन्हेगारांचे अड्डे बनले आहे. पोलिस प्रशासनाचे दुर्लक्ष पाहता शहरासह ग्रामीण पट्ट्यात अवैध धंद्याचा सुळसुळाट वाढला आहे. अवैध वाळू वाहतुकीसह गावठी पिस्तुलांचा वाढता व्यापार पाहता शहरासह ग्रामीण पट्ट्यामध्ये गावगुंडांच्या टोळ्या वाढत आहेत. दरम्यान, पोलिस निरीक्षक ठेंगे यांना राहुरीचा पदभार सोपविण्यात आला आहे. हजर होताच राहुरीत धार्मिक वादाची ठिणगी पडलेली आहे. त्यामुळे वाढत्या धार्मिक वादावर नियंत्रण मिळवीत पोलिस प्रशासनाला गुन्हेगारी कमी करावी लागणार आहे. राहुरी पोलिस ठाण्यामध्ये अधिकार्‍यांवर वादग्रस्त विषयांची टांगती तलवार उभीच असल्याने प्रशासनाच्या कामकाजावर परिणाम होत असल्याची चर्चा आहे.

गुन्हेगारी मोडकळीस आणणार का?

शांत व समृद्धतेचा शिक्कामोर्तब झालेल्या राहुरी तालुक्यात गुन्हेगारी जिल्ह्यात चर्चेची ठरत आहे. वाढत्या गुन्ह्यांची संख्या पाहता सक्षम पोलिस अधिकारी राहुरीत टिकेनासा झाला आहे. पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांना राहुरीत चार्ज मिळाला. परंतु ते गुन्हेगारी कमी करीत राहुरीत कार्यकाळ पूर्ण करणार का? याबाबत चर्चा रंगल्या आहेत.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news