वीजपुरवठा खंडित केल्याने शेवगाव-पाथर्डी प्रादेशिक पाणीयोजना पाच दिवसापांसून बंद आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची बोंबाबोंब झाली असून, शनिवारी फक्त शेवगाव व पाथर्डी शहरांचा पाणीपुरवठा पूर्ववत करण्यात आला.
थकित वीजबिलासाठी शेवगाव-पाथर्डी प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला. या योजनेचे 10 कोटी रुपयांचे वीजबिल थकबाकीत आहे. मात्र, केवळ पाण्याची अत्यावश्यक गरज लक्षात घेता, प्रत्येक वेळी महावितरणची किमान चालू वीज बिल भरण्याची सक्ती असते. त्या शिवाय योजनेचा वीजपुरवठा सुरळीत केला जात नाही.
शेवगाव नगरपरिषद व पाथर्डी नगरपरिषदांनी प्रत्येकी दहा लाख रुपये पाणीपट्टी दोन दिवसापूर्वी अदा केली. या व्यतिरिक्त लवकरच आणखी एवढीच रक्कम देण्याची तयारी दर्शविल्याने दोन्ही शहरांचा पाणी पुरवठा शनिवारी सायकांळी पूर्ववत करण्यात आला. ग्रामीण भागातील लाभार्थी नागरिकांची मात्र पाण्यासाठी बोंबाबोंब सुरू आहे. तीन महिन्यांचे चालु वीजबिल सुमारे एक कोटी रुपये भरण्याची सक्ती महावितरण करीत असून, त्या शिवाय ग्राणी भागाला पाणी नाही असे सांगितले जात आहे.
कालबाह्य झालेल्या या योजनेच्या पाण्याशिवाय लाखो लाभार्थी नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा इतर स्त्रोत्र नाही. तसेच शहरासह प्रत्येक गावात नियोजन अभावी सतत पाण्याची गैरसोय ठरलेली आहे. ग्रामपंचायती सक्तीने पाणीपट्टी वसूल करतात. मात्र, काही ग्रामपंचायती वसुल झालेली पूर्ण रक्कम न भरता काही रक्कम इतर कामावर खर्च करतात. परिणामी त्या गावची थकबाकी वाढत गेलेली आहे.
शेवगाव शहर , पाथर्डी शहर व अमरापूर, माळी बाभूळगाव अशा तीन स्वंतत्र पाणी पुरवठा योजना गत वर्षी मंजूर झाल्या आहेत. पाथर्डी नगरपरिषद व अमरापूर, माळी बाभूळगाव योजनेचे काम संथ गतीने सुरू असल्याने मुदतीच्या आत काम पूर्णत्वास येण्यास अडचण तयार होत आहे. शेवगाव नगरपरिषद योजनेच्या भोंगळ कारभारात अद्याप सुधारणा झाली दिसून येत नसल्याने या योजनेच्या कामाचा प्रारंभ केव्हा होणार हे अद्याप अनिश्चित आहे
दरम्यान, सध्या इतरत्र ठिकाणचे पिण्याचे पाणी वापरल्याने काही साथीचे आजार जडत असल्याचे लक्षात घेता ही योजना तातडीने सुरू करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.