नगर : पुढारी वृत्तसेवा : हॉटेल, रेस्टॉरंटमधील प्लास्टिकसह अन्य घातक कचरा आणि तेथील सांडपाण्याचे योग्य व्यवस्थापन नसल्यास मानवी आरोग्यासह पशुपक्ष्यांंच्या जीवालाही धोका संभवतो. त्यामुळे रेस्टॉरंट, हॉटेल सुरू करण्यापूर्वी त्यांना प्रदूषण नियामक मंडळाचा परवाना बंधनकारक आहे. मात्र आजही नगर शहरासह जिल्ह्यातील हजारो हॉटेल व रेस्टॉरंट हे प्रदूषण मंडळाच्या परवान्याशिवाय सुरू असून, यातील तक्रारी आलेल्या अकोलेतील 14 आणि शिर्डीतील 335 हॉटेलना प्रदूषण नियामक मंडळाकडून नोटिसा बजावण्या आल्या आहेत.
महाराष्ट्र प्रदूषण नियामक मंडळाचे नगर येथील उपप्रादेशिक कार्यालयातून हॉटेल्स, रेस्टॉरंट, हॉस्पिटल, स्टोन क्रेशर यांसह औद्योगिक क्षेत्रामधील साखर कारखाने, उद्योगांद्वारे प्रदूषण होऊ नये, यासाठी नियंत्रण ठेवले जाते. वेळोवेळी पाहणी करून त्यांना सूचना केल्या जातात. त्रुटींची पूर्तता करून घेतली जाते. प्रसंगी नोटिसा आणि दंडात्मक कारवाईची केली जाते. अशाच प्रकारे अकोले आणि शिर्डी येथील हॉटेल्स आणि रेस्टॉरंटमधील नियोजनाअभावी प्रदूषण वाढत असल्याच्या तक्रारी कार्यालयापर्यंत्त पोहोचल्या होत्या. शिवाय संबंधितांनी प्रदूषण नियामक मंडळाचे परवानेही घेतलेल नसल्याचे निदर्शनास आणून दिले होते. त्यामुळे उपक्षेत्रिक अधिकारी शिंदे यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार अकोल्यातील 14 आणि शिर्डीतील 335 हॉटेल्स, रेस्टॉरंटना नोटिसा बजावत परवान्याची विचारणा केली आहे. याबाबतचा खुलासा मागाविण्यात आला असून, त्यानंतर कारवाईची दिशा ठरविली जाणार असल्याचेही समजले. प्रदूषण नियामक मंडळाच्या या कारवाईने विनापरवाना सुरू असलेली हॉटेले, रेस्टॉरंट चालकांमध्ये खळबळ उडाली आहे.
जिल्ह्यात नगर तालुक्यासह संग़मनेर व अन्य तालुक्यांत एकूण 250 पेक्षा अधिक स्टोन क्रशर आहेत. या ठिकाणीही शेडच्या उभारणीसह अन्य नियमावलीचे पालन न करणार्या क्रशरवर दंडात्मक कारवाया करण्यात आल्या आहेत. यापुढेही नियमावली पायदळी तुडविल्यास कायदेशीर कारवाईचा बडगा उगारला जाणार असल्याचे शिंदे म्हणाले. गत महिन्यात क्षेत्रीय अधिकार्यांनी एमआयडीसीमधील कंपन्यांची पाहणी केली असता त्यात काही तांत्रिक त्रुटी आढळल्याने दोन नामांकित कंपन्यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. त्रुटी किरकोळ स्वरूपाच्या असल्या, तरी त्याच्या पूर्ततेवर प्रशासनाचा वॉच असणार आहे.
हॉटेल आणि रेस्टॉरंटला प्रदूषण नियामक मंडळाचा परवाना बंधनकारक आहे. परवाना नसल्याने अकोल्यातील 14 आणि शिर्डीतील 335 हॉटेल आणि रेस्टॉरंटना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. नियमावलीचे पालन करून ज्यांनी आतापर्यंत परवाने काढलेले नाहीत, त्यांनी पूर्तता करावी. तसेच गावातील सर्व्हिस स्टेशनलाही परवाना बंधनकारक करण्यात आला असून, त्यांनी याचे काटेकोर पालन करावे.
– सी. एन. शिंदे, उपक्षेत्रिय अधिकारी, नगर
हेही वाचा