

नगर : पुढारी वृत्तसेवा
जिल्ह्यात रब्बी पेरणीस प्रारंभ झाला असून, मंगळवारपर्यंत ९ टक्के म्हणजे ४० हजार २४० हेक्टर क्षेत्रावर पेरणी झालेली आहे. सर्वाधिक ३८ हजार ११२ हेक्टर क्षेत्रावर ज्वारीचा पेरा झाला आहे. खरीप पिकांची काढणी सुरु आहे. त्यामुळे गहू पेरणीस अद्याप म्हणावा असा वेग आला नाही.
काढणी पूर्ण झाल्यानंतर वेग येणार आहे. यंदाच्या रब्बी हंगामासाठी कृषी विभागाने यंदा रब्बी हंगामासाठी ४ लाख ५८ हजार ६३५ हेक्टर क्षेत्र निश्चित केले आहे. यंदा सरासरीपेक्षा जादा पाऊस झाला असून, धरणे भरली आहेत. दमदार पावसामुळे विहिरींची पाणीपातळी वाढली आहे. त्यामुळे रब्बी हंगाम जोमात असणार आहे.
सध्या खरीप हंगामातील सोयाबीन, बाजरी, मका व इतर पिकांची बहुतांश ठिकाणी काढणी सुरु आहे. ज्या ज्या ठिकाणी काढणी पूर्ण होऊन रानं मोकळी झाली त्या त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी रब्बी पिकांची पेरणी सुरु केली आहे.
यंदा रब्बी ज्वारीसाठी सर्वाधिक २ लाख ६७ हजार ८३४ हेक्टर क्षेत्र निश्चित असून आतापर्यंत ३८ हजार ११२ हेक्टर क्षेत्रावर ज्वारीची पेरणी झाली आहे. यंदा ८६ हजार ४०४.८ हेक्टर क्षेत्रावर गव्हाचा पेरा अपेक्षित आहे. आतापर्यंत फक्त २५.५ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे.
मका पिकासाठी १४ हजार ११८ हेक्टर क्षेत्र असून, आतापर्यंत १ हजार ६२२ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. जिल्ह्यातील ८८ हजार ३७७ हेक्टर क्षेत्रावर यंदा हरबरा पेरणी अपेक्षित असून, आतापर्यंत ३५४ हेक्टर क्षेत्रावर हरबऱ्याची पेरणी झाली आहे. आतापर्यंत २२ हजार ७७८ हेक्टर क्षेत्रावर उसाची पेरणी झालेली आहे.
गळीत धान्य पिकांसाठी ४८६ हेक्टर क्षेत्र निश्चित केले असून करडईसाठी सर्वाधिक ३६१ क्षेत्र असणार आहे. आतापर्यंत १८ हेक्टरवर करडईची पेरणी झाली आहे. ११.३ हेक्टरवर तीळ, १४.४ हेक्टरवर सूर्यफुलाची पेरणी झाली आहे. अद्याप जवस पेरणीस प्रारंभ झालेला नाही.