Nilesh Lanke | इंग्रजीवरुन हिणवलेल्या लंकेंनी खासदारकीची शपथ घेतली इंग्रजीतून...
पुढारी ऑनलाईन डेस्क : अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांनी आज (दि.२५) लोकसभा सभागृहात खासदारकीची शपथ घेतली. ही शपथ त्यांनी इंग्रजीतून घेतली. यामुळे निलेश लंके चर्चेत आले आहेत. त्यापाठीमागे एक पार्श्वभूमी आहे.
निलेश लंकेनी खादरकीची शपथ घेतली इंग्रजीमधून
अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचे खा. निलेश लंके यांनी खासदारकीची शपथ घेतली
ही शपथ त्यांनी इंग्रजी भाषेतून घेतली
भाजप नेते सुजय विखे-पाटील यांनी निलेश लंकेंना इंग्रजीवरुन हिणवले होते
अहमदनगर लोकसभा मतदारसंघ निवडणूक लक्षवेधी
नुकतीच लोकसभा निवडणूक पार पाडली. या निवडणुकीतील महाराष्ट्रामधील लक्षवेधी लढतीपैकी अहमदनगर मतदार संघामधील लढत लक्षवेधी ठरलेली. शरद पवार गटाचे उमेदवार निलेश लंके यांनी भाजपचे उमेदवार सुजय विखे-पाटील यांचा पराभव केला आणि त्यांनी भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावला. ही लढत अटीतटीची, प्रतिष्ठेची, लक्षवेधी ठरली होती.
'इंग्रजीमधून भाषण फाडफाड करुन दाखवावं'
लोकसभा निवडणुकीपुर्वी प्रचारादरम्यान भाजपचे उमेदवार सुजय विखे-पाटील यांनी निलेश लंके यांना आवाहन केले होते की, ‘ इंग्रजीतून मी केलेले भाषण, निलेश लंके यांनी पाठांतर करावं आणि नंतर सभेत फाडफाड इंग्रजीतून करून दाखवावे, जर त्यांनी इंग्रजीतून भाषण केले तर मी उमेदवारी अर्ज भरणार नाही,’.
या आवाहनाला निलेश लंके यांनीही जोरदार प्रत्त्युतर देत म्हटले होते, " माझ्या समोरच्या उमेदवाराने इंग्रजीतून भाषण करण्याची स्पर्धा लावली आहे. प्रत्येकाला आपल्या मातृभाषेचा अभिमान असायला पाहिजे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या देशाची घटना लिहिली आहे आणि संसदेत प्रत्येक खासदाराला आपल्या भाषेतून बोलण्याचा अधिकार आहे. पुढे बोलताना ते म्हणाले होते, तुम्ही कोणत्या भाषेत बोलता यापेक्षा तुम्ही शेतकऱ्यांची आणि सर्वसामान्य लोकांची किती बाजू धरुन काम करता महत्त्वाचे आहे.
लंकेंनी घेतली इंग्रजीमधून शपथ, आय एम निलेश...
दरम्यान आज (दि.२५) नवनिर्वाचित खासदारांनी लोकसभा गृहात खासदारकीची शपथ घेतली. यावेळी खासदार निलेश लंके यांनी खासदारकीची शपथ इंग्रजीमधून घेतली. शपथ घेतानाचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होवू लागला आहे. खासदार निलेश लंके यांनी इंग्रजीमधून शपथ घेत सुजय विखे पाटील यांना जोरदार प्रत्त्युतर दिले आहे. अशी चर्चा राजकीय वर्तुळात होवू लागली आहे.
खासदार निलेश लंके यांनी शपथ घेतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत म्हटलं आहे, "आज मी नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचा खासदार म्हणून इंग्रजीत शपथ घेतली. या क्षणी माझ्यावर असलेल्या प्रचंड जबाबदारीची मला पूर्ण जाणीव आहे. माझ्या मतदारसंघातील लोकांप्रती असलेली माझी कर्तव्ये पूर्ण समर्पणाने पार पाडण्यासाठी मी कटिबद्ध आहे. आणि लोकांच्या माझ्यावरील विश्वास आणखी दृढ होण्यासाठी मी सतत काम करत राहीन.

