

Astagaon Drowning Incident Husband Youth Dies
राहाता : शेततळ्यात पडलेल्या पत्नीला वाचविताना पती आणि एका तरुणाचा पाण्यात दम लागल्याने बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. अस्तगाव (ता. राहाता) येथील घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पती रामदास सखाहारी चोळके (वय ५५) व आदेश आण्णासाहेब नळे (वय २४) अशी मृतांची नावे आहेत.
मिळालेल्या माहिती नुसार सुमन रामदास चोळके आपल्या घराजवळील शेततळ्यात पडल्या होत्या. त्यांना वाचविण्यासाठी तत्काळ पती रामदास चोळके यांनी शेत तळ्यात उडी घेतली. यावेळी ते आपल्या पत्नीला वाचवण्यासाठी शर्तीचा प्रयत्न करत असतानाच त्यांच्या मदतीला शेजारी राहणारा युवक आदेश नळे यानेही तळ्यात उडी घेऊन सुमन चोळके यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. दोघांनी केलेल्या शर्तीच्या प्रयत्नानंतर सुमन चोळके यांना तळ्यातून बाहेर काढण्यात यश आले. मात्र, या घटनेदरम्यान पती रामदास आणि आदेश यांना दम लागल्याने त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.
ही घटना समजताच अस्तगाव व परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन जेसीबीच्या साह्याने तळे फोडून पाणी बाहेर काढून दोन्ही मृतदेह तळ्याबाहेर काढले. मात्र, दोघांना आपला जीव गमवावा लागला. या दुर्देवी घटनेमुळे अस्तगाव सह तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे. सुमन चोळके यांना उपचारासाठी प्रवरा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. या घटनेचा पुढील तपास राहाता पोलीस करीत आहेत.