

नगर : श्रीकांत राऊत लाडक्या गणरायाचे आगमन अर्थात गणेशोत्सव दहा दिवसांवर येऊन ठेपल्याने शहरातील विविध कारखान्यांमध्ये बाप्पांच्या मूर्तींवर रंगांचा अखेरचा हात फिरविण्याचे काम जोमात सुरू आहे. मूर्तीचे डोळे, दागिन्यांची रंगरंगोटी सध्या वेगात सुरू असून, त्यासाठी कामगार रोज बारा ते पंधरा तास काम करत आहेत. कारखान्यांत 50 टक्के मूर्तींचे बुकिंग झाले असून, 80 टक्के काम पूर्ण झाले आहे.
बाजारात मूर्ती विक्रीसाठी दाखल झाल्या आहेत. दरम्यान, कच्च्या मालाच्या किमती वाढल्याने यंदा गणेशमूर्तींच्या किमतीत 30 टक्क्यांनी वाढ झाल्याचे व्यावसायिकांकडून सांगण्यात येत आहे. नगर शहरात गणेशमूर्ती बनवणारे लहान-मोठे शंभर कारखाने असून, हजारो गणेशमूर्ती साकारल्या गेल्या आहेत. सात इंचांपासून तर 10 फुटांपर्यंत उंचीच्या मूर्ती तयार झाल्या असून यावर्षी गणेशमूर्तींच्या किमतीत 30 टक्के वाढ झाली आहे. नगरच्या गणेशमूर्तींना देशांतर्गत बाजारात मोठी मागणी असते. गुजरात, मध्य प्रदेश, हैदराबाद (तेलंगणा) आणि महाराष्ट्राच्या विविध भागात नगरमधून गणेशमूर्ती पाठविल्या जातात.
गणेश मंडळांना प्लास्टर ऑफ पॅरिस (पीओपी)च्या नियमांबाबत मोठा दिलासा मिळाला आहे. चार फुटांवरील मूर्तींसाठी पीओपीचा वापर करता येणार आहे. मात्र, चार फुटांपेक्षा कमी उंचीच्या मूर्तींसाठी शाडूची माती बंधनकारक असणार आहे.
गणेशमूर्तींबाबत सरकारने सर्व निर्बंध उठविल्याने मोठ्या मूर्तींना यावर्षी सार्वजनिक मंडळांकडून मागणी आहे. कच्च्या मालाचे भाव वाढल्याने गेल्या वर्षीच्या तुलनेत मूर्तीच्या किमतीत 30 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
– अमोल मनोहर देशमुख, कारखाना मालक, नगर