पाथर्डी तालुका ः पुढारी वृत्तसेवा
सरकारच्या आनंदाचा शिधा योजनेमध्ये 50 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी पाथर्डी तहसील कार्यालयात काम करणार्या खासगी व्यक्तीविरोधात मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी स्वस्त धान्य वितरक अर्जुन शिरसाट (रा. अंबिकानगर ता. पाथर्डी) यांनी काकासाहेब महादेव सानप (रा. शिरसाटवाडी, ता. पाथर्डी) या आरोपीविरोधात ही तक्रार दाखल केली आहे.
शिरसाट यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, मार्च ते डिसेंबर 2023पर्यंत तहसील कार्यालयातील पुरवठा विभागात काम करणारा खासगी व्यक्ती काकासाहेब सानप याच्याकडे तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदारांनी तत्कालीन तहसीलदार, तालुका पुरवठा अधिकारी व पुरवठा निरीक्षक यांच्या सांगण्यावरून रक्कम जमा केली. शिरसाट यांनी त्यांच्या एकूण तीन आनंदाचा शिधा संचाची अंदाजे एकूण रक्कम 45 हजार 214 रुपये सानप याच्याकडे ऑनलाइन पद्धतीने जमा केले. मात्र, सानप याने त्या रकमा सरकारकडे जमा न करत स्वतःकडे ठेवून माझ्यासह तालुक्यातील इतर स्वस्त धान्य दुकानदारांंची अंदाजे 50 लाख रुपयांची फसवणूक केली आहे.
सानप याच्याकडे तालुक्यातील जवळपास 150 धान्य दुकानदारांनी पैसे भरण्यासाठी दिले होते. मात्र, ते त्यांनी भरले नाहीत. या सर्व दुकानदारांची एकूण रक्कम 50 लाखांपुढे असण्याची शक्यता फिर्यादीत वर्तवली आहे.
सानप याने ही सर्व रक्कम सरकारकडे भरणे अपेक्षित होते. मात्र, त्याने ते पैसे भरले नसून सरकारच्या पैशावर डल्ला मारला आहे. सानप हा दुकानांचे चलन भरणे, रेशनकार्ड ऑनलाइन करून देणे आदी कामे तो करत होता. तसेच पाथर्डी तालुका दुकानदार नावाने पुरवठा निरीक्षकांनी तयार केलेल्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये अॅड होता. आता पोलिस कशा पद्धतीने तपास करतात यावर सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.