‘संपदा’च्या वाटेवर आता ‘ध्येय’ही! ‘ध्येय मल्टिस्टेट’च्या संचालकांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

‘संपदा’च्या वाटेवर आता ‘ध्येय’ही! ‘ध्येय मल्टिस्टेट’च्या संचालकांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा
Published on
Updated on

नगर : पुढारी वृत्तसेवा: नगर शहरासह ग्रामीण भागात शाखा सुरू केलेल्या ध्येय मल्टिस्टेट निधी लिमिटेड संस्थेने ज्यादा परतावा देण्याचे आमिष दाखवून फसवणूक केल्याच्या आरोपावरून संचालक मंडळाविरूद्ध तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. संस्थेने सर्वच शाखा बंद केल्या असून, ठेवीदारांची पाच कोटी 78 लाख 65 हजारांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे.
ध्येय मल्टीस्टेटचे चेअरमन विशाल लक्ष्मण भागानगरे (रा. पंचपीर चावडी, माळीवाडा), व्हाईस चेअरमन रोहिदास सत्यदेव कवडे (रा. गुलमोहर रोड, सावेडी), संचालक व सीईओ राहुल बबन कराळे (रा. टोकेवाडी, ता.नगर), संचालक नीलेश शिवाजी फुंदे (रा. राजलक्ष्मी सेंटर, सावेडी), गणेश कारभारी कराळे (रा. आगडगाव, ता. नगर), विलास नामदेव रावते (रा. बोरुडेमळा, सावेडी), पूजा विलास रावते (रा. बोरुडेमळा, सावेडी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

याबाबत ठेवीदार सुजाता संदीप नेवसे (रा. शिंदे मळा, सावेडी) यांनी तोफखाना पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की, ध्येय मल्टिस्टेटच्या पाईपलाईन रोडवरील शाखेत 1 डिसेंबर 2022 रोजी 1 वर्षाच्या मुदतीवर 2 लाख रुपये ठेव ठेवले होते. त्यानंतर पुन्हा 19 ऑगस्ट 2023 रोजी 1 लाख 75 हजार रुपये 1 वर्षाच्या मुदतीवर ठेवले. अशी एकूण 3 लाख 75 हजार रुपये ठेव ठेवली होती. त्यावर 14.40 टक्के व्याजदराने परतावा देण्याचे आमिष दाखविण्यात आले होते. पहिल्या ठेवीची मुदत संपल्यावर त्यांनी 3 डिसेंबर 2023 रोजी बालिकाश्रम रोडवरील मुख्य शाखेत चेअरमन विशाल भागानगरे यांची भेट घेऊन ठेवीची रक्कम व्याजासह मागितली असता चेअरमन भागानगरे याने, 'सध्या आमच्याकडे पैसे नाहीत. आम्ही जे कर्जवाटप केलेले आहे, त्याची वसुली सुरू असून ते पैसे आल्यावर आम्ही तुम्हाला बोलावून तुमचे पैसे देऊ,' असे सांगितले. त्यानंतर अनेकदा पाठपुरावा करूनही त्यांना उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली.

15 डिसेंबर 2023 रोजी समजले की ध्येय मल्टिस्टेटची शाखा बंद झाली आहे. त्यानंतर पाईपलाईन शाखेच्या व्यवस्थापकांना फोन करून विचारले असता त्यांनी सर्व शाखा बंद झाल्याचे सांगितले. चेअरमन व संचालकांनी संस्थेत येणे बंद केले आहे. माझाही त्यांच्याशी संपर्क होत नाही. तुम्ही पोलिसांत तक्रार करा, असा सल्लाही त्यांनी दिला. पोलिस ठाण्यात आल्यानंतर समजले, की माझ्यासह सुमारे 112 ठेवीदारांचे 5 कोटी 78 लाख 65 हजारांच्या ठेवी संस्थेत अडकल्या आहेत. माझ्यासह 112 ठेवीदारांच्या ठेवी परत न देता त्यांची फसवणूक केल्याप्रकरणी चेअरमन व संचालकांवर फसवणुकीसह महाराष्ट्र ठेवीदारांच्या हितसंबंधांचे संरक्षण (वित्तीय संस्थांमधील) अधिनियम (एमपीआयडी) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलिस उपनिरीक्षक सचिन रणशेवरे करीत आहेत.

गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग होणार

ध्येय मल्टिस्टेट निधी लिमिटेड या संस्थेच्या नगर शहरासह जिल्ह्यातील अनेक गावागावांत शाखा होत्या. त्यात ठेवीदारांचीही संख्या मोठी आहे. अडकलेल्या ठेवींची रक्कम पाच कोटी 78 लाख 65 हजार आहे. दाखल झालेला गुन्हा व त्यातील ठेवीदारांची संख्या आणि फसवणूक झालेली रक्कम सध्या जरी कमी दिसत असली तरी या गुन्ह्याची व्याप्ती मोठी असल्याने सदरचा गुन्हा लवकरच आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग केला जाणार असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.

यांचे अडकले पैसे

शेतकरी, व्यावसायिक, शेतमजूर, शेतकरी महिला, शिक्षक, किराणा दुकानदार, सेवानिवृत्त नागरिक आदींचे पैसे संस्थेत अडकले आहेत. 5 हजारांपासून 25 हजारांपर्यंत ग्रामीण भागातील महिलांनी पैसे ठेवले आहेत. त्यात काही ठेवीदार बीड जिल्ह्यातील आहेत.

इथे होत्या शाखा

ध्येय मल्टिस्टेट निधी लिमिटेड या संस्थेच्या नगर शहरासह जिल्ह्यातील ग्रामीण भागात विविध ठिकाणी शाखा होत्या. मुख्य शाखा बालिकाश्रम रोड येथे असून, पाईपलाईन रोड, मार्केट यार्ड, भिंगार, सारोळा कासार (ता. नगर), घोगरगाव, काष्टी(ता. श्रीगोंदा), कर्जत, मिरजगाव, बिटकेवाडी, कुळधरण (ता. कर्जत).

'सध्या आमच्याकडे पैसे नाहीत. आम्ही जे कर्जवाटप केलेले आहे, त्याची वसुली सुरू असून ते पैसे आल्यावर आम्ही तुम्हाला बोलावून तुमचे पैसे देऊ,'

– चेअरमनचे तक्रारदाराला उत्तर

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news