Diwali Pahat 2024| प्रसिद्ध संगीतकार आणि गायक श्रीधर फडके दिवाळी पहाटेत भरणार स्वररंग

दैनिक 'पुढारी'च्या वतीने समस्त नगरकरांसाठी बहारदार सांगीतिक मैफल
Diwali Pahat 2024
Diwali Pahat 2024File Photo
Published on
Updated on

अहिल्यानगर (अहमदनगर) : महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वांत मोठा असलेला हा जिल्हा सहकाराचीच नव्हे तर संत, शाहिरी, नाट्य, चित्र आणि शिल्पकलेची भूमी म्हणूनही प्रसिद्ध आहे. संत ज्ञानेश्वर माउलींनी 'ज्ञानेश्वरी' चे लेखन केले तो नेवासा तालुका इथलाच. अशा या सांस्कृतिक विविधतेने नटलेल्या शहरात दैनिक 'पुढारी' दिवाळी पहाटेला स्वर-संगीताचा साज चढविणार आहे.

स्वरतीर्थ स्व. सुधीर फडके उपाख्य बाबूजी यांचे चिरंजीव श्रीधर फडके नगरकरांना सांगीतिक गीतांची पर्वणी देणार आहेत ! अनेक पौराणिक घटनांचा, ऐतिहासिक पार्श्वभूमी असणारा, मराठी चित्रपटसृष्टीला अनेक नामवंत कलाकार देणारा जिल्हा म्हणून नगरची ओळख आहे. या शहरात अनेक सांस्कृतिक, सांगीतिक कार्यक्रम, नाट्यप्रयोग यांची वर्षभर रेलचेल असते.

त्यामुळे नगर शहर सांस्कृतिक वारसा जपणारे शहर म्हणून ख्यातीप्राप्त आहे. दै. 'पुढारी'ने सुरू केलेल्या दिवाळी पहाट उपक्रमाचे यंदाचे हे दुसरे पुष्प आहे. 'बाबूजी आणि मी' या कार्यक्रमाद्वारे श्रीधर फडके दिवाळी पहाटेत स्वररंग भरणार आहेत. तसेच, हा कार्यक्रम विनामूल्य आहे, याची रसिकांनी नोंद घ्यावी. माहिती तंत्रज्ञानामध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतलेले श्रीधर फडके यांनी संगीताचे कोणतेही औपचारिक शिक्षण घेतले नाही.

मात्र, बाबूजींचा म्हणजेच सुधीर फडके यांचा वारसा लाभलेल्या श्रीधरजी यांनी हा स्वरयज्ञ तेवत ठेवला आहे. 'देवाचिये द्वारी उभा क्षणभरी' या पहिल्या संत ज्ञानेश्वरांच्या श्लोकास संगीत दिले. ते ऐकून सुधीर फडके यांनीसुद्धा या चालीस मनापासून दाद दिली. अमेरिकेत एका कार्यक्रमात त्यांनी हे गीत गायले देखील.

'ओंकार स्वरूपा' या पंडित सुरेश वाडकर यांच्या आवाजातील रचनेचे संगीतकार श्रीधर फडके हेच आहेत. 'लक्ष्मीची पाऊले' या मराठी चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीच्या संगीतविश्वात प्रवेश केला. याशिवाय त्यांनी काही हिंदी चित्रपटांना देखील संगीत दिले आहे. नगर येथे होणाऱ्या दिवाळी पहाट कार्यक्रमात स्व. सुधीर फडके यांच्या देव देव्हाऱ्यात नाही

... सखी मंद झाल्या तारका... एक धागा सुखाचा... आज कुणीतरी यावे... कानडा राजा पंढरीचा... आणि श्रीधर फडके यांनी संगीतबद्ध केलेल्या विठ्ठल आवडी प्रेमभाव... फिटे अंधाराचे जाळे... ऋतू हिरवा, त्या कोवळ्या फुलांचा... या आणि काही रचना सादर होतील. नुकतीच वयाची पंचाहत्तर वर्षे पूर्ण केलेले श्रीधर फडके आजही मोठ्या उत्साहात आणि तितक्याच ताकदीने आपल्या रचना सादर करतात.

'गीतरामायण' तर हे त्यांचे खास वैशिष्ट्य आहे. अशा दिग्गज कलाकाराला प्रत्यक्ष ऐकणे आणि अनुभूती घेणे म्हणजे एक खास पर्वणीच असते. नगरकरांना यानिमित्त दिवाळी पाडवा अधिक गोड करण्याची सुवर्णसंधी आहे. तरी, सर्वांनी या विनामूल्य सांगीतिक गीतांच्या पर्वणीचा अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन दै. 'पुढारी'च्या वतीने करण्यात आले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news