

श्रीरामपूर : पुढारी वृत्तसेवा
पावसाळ्यात कुठलाही भाजीपाला पिकांची नव्याने लागवड घेणे, अथवा कांदा रोप टाकणे, लसूण लावणे आदी कामे हस्त नक्षत्र समाप्त होईपर्यंत शेतकरी थांबून घेतात. हस्त नक्षत्राचा मुसळधार पाऊस पीक नुकसानीचा समजला जातो. परंतु यावर्षी हस्त नक्षत्राचा पाऊस जेमतेम पडला.
त्यानंतर सुरू झालेल्या चित्रा नक्षत्राने मात्र हस्त नक्षत्रांची कसर भरून काढत पावसाळ्यातील अंदाजासह शेत शिवाराचे चित्रच बदलून टाकले. १० ऑक्टोबरला चित्रा नक्षत्राची सुरूवात झाल्यापासून दि. २३ ऑक्टोबरला स्वाती नक्षत्रास प्रारंभ होईपर्यंत आतापर्यंतच्या सर्व नक्षत्रांचे रेकॉर्ड या चित्रा नक्षत्राने मोडित काढले.
भाग बदलत पाऊस कोसळला असला तरी त्याने कुठल्याच गावाला, तालुक्याला, जिल्ह्याला सोडले नाही. श्रीरामपूर तालुक्याच्या पूर्व परिसरात दोन आठवड्यांच्या कालावधीत वेगवेगळ्या दिवशी रात्रीच्या सुमारास जोरदार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे मृग नक्षत्रात ज्या शेतकऱ्यांनी आगस सोयाबीन पेरणी केली.
त्या शेतकऱ्यांची सोयाबीन नवरात्र घटस्थापनेपूर्वी पावसाच्या वातावरणात त्रेधापिट होऊन काढणीस आली. उशीराने जुलैच्या पहिल्या आठवड्यात सोयाबीन पेरणीची काढणी, हस्त नक्षत्र संपल्यावर होणार असल्याने शेतकरी खुश होते.
परंतु चित्रा नक्षत्राने चित्रच बदलून टाकल्याने अगोदर पावसाळ्यात सोयाबीन काढणी केलेल्या शेतकऱ्यांपेक्षाही मागे राहिलेल्या शेतकऱ्यांचे खुपच हाल होत आहेत. पावसाचे पाणी शेतात असल्याने स्वाती नक्षत्रास सुरूवात होऊनही पाऊस थांबायचे नाव घेत नसल्याने, पाला गळती होऊन काढणीस आलेली सोयाबीन बहतांश ठिकाणी शेतातच काढणीच्या प्रतिक्षेत आहे.
पावसाने काढणीस आलेल्या कापसाची वेचणीही लांबली आहे. बहुतांश मजूर अद्याप सोयाबीन काढणीत अडकलेले असल्याने, कापूस वेचणी मजुराअभावी टांगली आहे. ऊस लागवडीसाठी रिकामी झालेली शेत, मशागतीस वापसा नसल्याने पडून आहेत.
त्यामुळे १० व्या महिन्यातील ऊस लागवडीच्या साखर कारखाना नोंदी ११ व्यात सर्वाधिक होणार आहेत. पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक कांदा रोपे टाकणे मागे राहिले आहे. कांदा लागवडीस उशीर होणार असल्याने यावर्षी कांदा पेरणीकडे सर्वाधिक शेतकऱ्यांचा कल असणार आहे.