

शिर्डी : लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात संविधानविरोधी आणि अराजकतावादी शक्तींचा प्रादुर्भाव झाला. भाजपला पराभूत करता येत नसल्याने काँग्रेस, उद्धव ठाकरेंची सेना आणि शरद पवारांच्या पक्षाने या अराजकतावादी शक्तींना हाताशी धरून अराजक निर्माण करण्याचा प्रयत्न केला. ‘व्होट जिहाद’ आणि फेक नॅरेटिव्हनंतर आता ‘व्होट जिहाद’चा दुसरा भाग सुरू झाल्याचा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिर्डी येथील भाजपच्या अधिवेशनात केला.
राष्ट्रीय विचारांच्या संघटनांनी एकत्रित येऊन त्यांना पराभूत केले. मात्र, विधानसभा निवडणुकीत पराभव झाला म्हणून त्यांच्या कारवाया थांबल्या नाहीत. खोटे जन्मदाखले मिळवत मतदार याद्यांमध्ये बांगलादेशी नागरिकांची घुसखोरी चालू असून या अराजकतावाद्यांच्या विरोधात आपली लढाई आणखी घट्ट करायची असल्याचेही फडणवीस म्हणाले. फडणवीस यांनी विधानसभा निवडणुकीतील विजयाचे सारे श्रेय हे कार्यकर्ते आणि पदाधिकार्यांचे असल्याचे सांगितले. लोकसभा निवडणुकीतील अराजकतावाद्यांच्या कारवायांना विधानसभेत राष्ट्रीय विचारांच्या संघटनांनी एकत्रित येत उत्तर दिले. व्होट जिहाद, फेक नॅरेटिव्हला प्रत्युत्तर दिले. मात्र, हा पराभवानंतरही त्यांच्या कारवाया थांबल्या नाहीत. व्होट जिहादचा दुसरा भाग आता सुरू झाला आहे.
ठिकठिकाणी बांगला देशी घुसखोरीचे प्रकार उघडकीस येत आहेत. मालेगाव, अंजनगावसारख्या ठिकाणी अचानक हजारो लोक जन्माचे प्रमाणपत्र काढत असल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. एकाच वेळी 50-60 वर्षांचे लोक अचानक जन्म दाखले काढतायत, एका एका गावात शंभर शंभर लोकांना जन्म दाखला मिळतोय. हे सगळे घुसखोर असून त्यांना बाहेर काढण्याचे आव्हान आपल्या समोर आहे. या देशात आणि महाराष्ट्रात एकही घुसखोर राहता कामा नये. त्यामुळे आपली लढाई आणखी घट्ट करावी लागणार आहे, असे फडणवीस म्हणाले.
हा महाराष्ट्र एकसंध राहिला पाहिजे. त्यासाठी ‘एक है तो सेफ है’चा मंत्र आपण पुढे घेऊन गेलो. त्यामुळे सर्व समाजाला एकत्र घेऊन आपल्याला पुढे जायचे असल्याने अराजकतावद्यांविरोधातील आपली लढाई सुरूच राहणार असल्याचेही फडणवीस म्हणाले. भाजपमध्ये श्रद्धा आणि सबुरी हा मंत्र पाळला जातो. ज्यांना हा मंत्र समजला ते यशस्वी झाले, ज्यांना नाही समजले त्यांची निवडणुकीत हालत बुरी झाली, असे म्हणत फडणवीस यांनी विरोधकांना खोचक टोला लगावला.