

नगर : विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील १५१ उमेदवारांनी केलेला अंतिम खर्च सादर केला आहे. अहमदनगर शहर मतदारसंघाचे आमदार संग्राम जगताप यांनी सर्वाधिक २९ लाख ७३ हजार २६८ रुपये प्रचारासाठी खर्च केला आहे. त्याखालोखाल श्रीरामपूरचे काँग्रेसचे आमदार हेमंत ओगले यांनी २८ लाख ९३ हजार ४४८ रुपये, तर अकोल्याचे आमदार डॉ. किरण लहामटे यांनी २८ लाख ७४ हजार ४८८ रुपये प्रचारावर खर्च केल्याची नोंद झाली आहे.
जिल्ह्यातील १२ मतदारसंघांत एकूण १५१ उमेदवारांनी विधानसभा निवडणूक लढवली आहे. निवडणूक प्रचारासाठी प्रत्येक उमेदवाराला ४० लाख रुपयांपर्यंत खर्च करण्यास भारत निवडणूक आयोगाने मुभा दिली होती. यामध्ये स्टार प्रचारकांची सभा, उमेदवारांची तसेच इतर नेत्यांची सभा, रॅली, रॅलीसाठी आवश्यक वाहने, भोजन, नाश्ता तसेच उमेदवारांचे प्रचारार्थ ठिकठिकाणी लागलेले फलक तसेच जाहिराती आदींचा दररोजचा खर्च उमेदवारांना निवडणूक विभागाला सादर करणे बंधनकारक होते. या उमेदवारांच्या दैनंदिन खर्चाची तपासणी मतदानापूर्वी तीन वेळा खर्च पथकाने निवडणूक निरीक्षकांच्या उपस्थितीत झाली होती. निवडणुकीतील प्रचाराचा अंतिम खर्च निकाल लागला त्या दिवसापासून ३० दिवसांत म्हणजे २३ डिसेंबरपर्यंत सादर करणे उमेदवारांना बंधनकारक होते. दरम्यान, १५१ उमेदवारांच्या अंतिम निवडणुकीचा प्रचार खर्चाची तपासणी १९. डिसेंबर रोजी निवडणूक खर्च निरीक्षकांच्या उपस्थितीत करण्यात आली. त्या वेळी खर्च कसा सादर करावा याचे मार्गदर्शन उमेदवार वा
त्यांच्या प्रतिनिधींना देण्यात आले होते. या मार्गदर्शनानंतर उमेदवारांनी निवडणूक प्रचाराचा खर्च जिल्हा निवडणूक अधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्याकडे सादर केला आहे. या निवडणूक कार्यालयामार्फत १५१ उमेदवारांचा निवडणूक खर्च भारत निवडणूक आयोगाकडे पाठविण्यात आला आहे. १५१ उमेदवारांपैकी राष्ट्रीय व राज्यस्तरीय पक्षांच्या उमेदवारांचा खर्च कमीत कमी १० ते जास्तीत जास्त ३० लाखांपर्यंत असल्याचे दिसत आहे. बहुतांश उमेदवारांनी दर्शविलेला खर्च आणि निवडणूक पथकांनी सादर केलेला खर्च यामध्ये तफावत आढळून आली आहे. मात्र, निवडणूक पथकांनी दर्शविलेला अंतिम खर्चच बहुतांश उमेदवारांनी मान्य केला आहे. अहमदनगर शहर मतदारसंघाचे आमदार संग्राम जगताप यांनी निवडणूक खर्च करण्यात आघाडी घेतली आहे. सर्वांत कमी १० लाख ७६ हजार रुपयांचा खर्च शिर्डीचे अपक्ष उमेदवार डॉ. राजेंद्र पिपाडा यांनी केला आहे. या मतदारसंघातील विजयी उमेदवार राधाकृष्ण विखे पाटील यांनी २८ लाख २७ हजार ८० रुपये, तर काँग्रेसच्या उमेदवार प्रभावती घोगरे यांनी १८ लाख ८० हजार ७७२ रुपये खर्च केला. अकोले मतदारसंघातील पराभूत उमेदवार अमित भांगरे यांनी २५ लाख ७४ हजार, वैभव पिचड यांनी २४ लाख ६९ हजार, कोपरगाव मतदारसंघातील पराभूत उमेदवार संदीप वर्षे यांनी १९ लाख २२ हजार, श्रीरामपूरचे पराभूत उमेदवार लहू कानडे यांनी २७ लाख ९७ हजार, भाऊसाहेब कांबळे यांनी १५ लाख ४२ हजार, नेवाशाचे शंकरराव गडाख यांनी १८ लाख ६० हजार, बाळासाहेब मुरकुटे यांनी १७ लाख ७१ हजार रुपये निवडणूक खर्च केला आहे.
कर्जत-जामखेड मतदारसंघातील पराभूत उमेदवार प्रा. राम शिंदे यांचा २२ लाख २२ हजार, श्रीगोद्याचे राहुल जगताप यांचा १५ लाख ८० हजार, अनुराधा नागवडे यांचा १६ लाख ६९ हजार, पारनेरच्या उमेदवार राणी लंके यांचा १२ लाख ८ हजार तर विजय औटी यांचा १५ लाख ६९ हजार रुपये इतका निवडणूक प्रचारावर खर्च झाला आहे.
श्रीरामपूर मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार लहू कानडे यांच्या खर्चात ५ लाख ८८ हजार रुपये, काँग्रेसचे उमेदवार हेमंत ओगले यांच्या खर्चात ६ लाख ६४ हजारांची तर शिवसेना उमेदवार भाऊसाहेब कांबळे यांच्या खर्चात ५ लाख ३ हजार रुपयांची तफावत आढळून आली. याशिवाय मोनिका राजळे यांच्या खर्चात ७७ हजार ६४०, अॅड. प्रताप ढाकणे यांच्या खर्चात १ लाख ८४ हजार, किरण लहामटे यांच्या खर्चात ३८ हजार ७७८, संदीप वर्षे यांच्या खर्चात ३७ हजार, तर डॉ. राजेंद्र पिपाडा यांच्या खर्चात ४३ हजार रुपये इतकी तफावत निवडणूक पथकांनी काढली. ही तफावत मान्य करीत या उमेदवारांनी अंतिम खर्च सादर केला आहे.