Crime News : अंगणवाडी सेविका बेपत्ता ; अंगणवाडीमध्ये रक्ताचा सडा, घातपाताचा संशय

महिलांमध्ये घबराट निर्माण झाली
crime news
अंगणवाडीPudhari
Published on
Updated on

चिचोंडी पाटील (ता. अहिल्यानगर) येथील मारुतीवाडी माळा येथील अंगणवाडी सेविका अंगणवाडीतून बेपत्ता झाली आहे. अंगणवाडीत रक्ताचा सडा व अंतवस्त्र आढळून आले असून, तिला फरफटत बाहेर नेल्याच्या खुणा दिसून येत आहेत. त्यामुळे घातपात झाल्याचा संशय व्यक्त होत असून, पोलिसांकडून शोध कार्य सुरू असून, रात्री उशिरापर्यंत नगर तालुका पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झालेली नव्हती.

याबाबत अधिक माहिती अशी ः चिचोंडी पाटील येथील मारुतीवाडी माळा येथील मिनी अंगणवाडीत सेविका गुरुवारी (दि. 24) सकाळी नेहमीप्रमाणे अंगणवाडीत गेल्या; मात्र संध्याकाळी उशिरापर्यंत घरी न आल्याने नातेवाइकांनी त्यांचा शोध घेतला. परंतु, त्या कोठेही आढळून आल्या नाहीत. या सेविकेने शाळेतील मुलांचा फोटोदेखील अपलोड केल्याचे त्यांच्या ग्रुपवर दिसत आहे.

त्यानंतर नातेवाईक व काही ग्रामस्थांनी थेट अंगणवाडीत जाऊन पाहणी केली असता अंगणवाडीला बाहेरून कुलूप लावलेले असल्याचे दिसून आले. नातेवाईक व ग्रामस्थांनी अंगणवाडीचे कुलूप तोडले असता आतील दृश्य पाहून सर्वांच्याच पायाखालची वाळू सरकली. अंगणवाडीच्या फरशीवर सर्वत्र सक्ताचा सडा पडलेला होता. डोक्याचे केस व अंतर्वस्त्रदेखील आढळून आले. फरशीवरून ओढत नेल्याच्या खुणा दिसत होत्या. त्यानंतर नातेवाईक व ग्रामस्थांनी अहिल्यानगर तालुका पोलिसांना माहिती दिली.

ही माहिती मिळताच सहायक पोलिस निरीक्षक प्रल्हाद गिते कर्मचार्‍यांसह तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी परिसरात पाहणी केली असता घटनास्थळापासून काही अंतरावर काहीतरी ओढत नेल्याच्या खुणा दिसत होत्या. काही अंतरावर परत काही कपडे आढळून आल्याने पोलिसांनी श्वानपथकास पाचारण केले होते. दरम्यान, रात्री पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनीदेखील घटनास्थळी भेट देऊन तपासाबाबत सूचना केल्या.

महिलांमध्ये घबराट

गावातील अंगणवाडीतून अंगणवाडी सेविकाच बेपत्ता झाल्याने चिचोंडी पाटील परिसरात खळबळ उडाली आहे. ही घटना थरकाप उडविणारी असल्याने परिसरात महिलांमध्ये घबराट निर्माण झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news