

शिर्डी : शरद पवार यांनी नेहमीच दगाफटक्याचे राजकारण केले. त्यांचे हे विश्वासघातकी राजकारण भाजपच्या कार्यकर्त्यांनी 20 फूट गाडले. उद्धव ठाकरे दगाफटका करून मुख्यमंत्री बनले. भाजपच्या तळागाळातील कार्यकर्त्यांच्या परिश्रमामुळे घराणेशाहीला चाप बसला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना ही खरी शिवसेना आहे. अजित पवार यांची राष्ट्रवादी हीच खरी राष्ट्रवादी आहे, अशा शब्दांत केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शहा यांनी शनिवारी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला. या अधिवेशनाच्या निमित्ताने भाजपने स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचे रणशिंग शिर्डीतून फुंकले.
शिर्डी येथे भाजप पदाधिकार्यांचे अधिवेशन झाले. अधिवेशनाला दहा हजारांहून अधिक पदाधिकारी उपस्थित होेते. या मेळाव्यात अमित शहा यांनी मार्गदर्शन केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण, राज्याचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचीही भाषणे झाली.
देशात गावपातळीवरील पंचायतपासून ते संसदेपर्यंत भाजपच्या विजयाचा भगवा फडकविण्यासाठी सज्ज राहा, तोपर्यंत आपला विजय अपूर्ण असल्याचे अमित शहा यांनी सांगितले. भाजपचा ध्वज फडकवून या महाविजय मेळाव्याला सुरुवात झाली. अधिवेशनाच्या सुरुवातीच्याच सत्रात विधानसभा निवडणुकीतील महाविजयाबद्दल जनतेचे आभार मानत त्यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव संमत करण्यात आला. कार्यकर्ते आणि पदाधिकार्यांच्या कष्टांमुळेच हा विजय साकारल्याची भावना अधिवेशनातील भाषणात सर्वच नेत्यांनी व्यक्त केली.
भाजप पदाधिकार्यांच्या या अधिवेशनाच्या संपूर्ण कामकाजावर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचाच प्रभाव जाणवत होता. राज्यातील सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका प्रलंबित आहेत. या निवडणुकांच्या निमित्ताने राज्यात एका अर्थाने मिनी विधानसभाच लढवली जाणार आहे. या निवडणुका कधी होणार याबाबत राजकीय कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आपल्या भाषणाची सुरुवातच विधानसभेपेक्षा मोठा प्रतिसाद स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मिळणार असल्याचा द़ृढ विश्वास व्यक्त केला. भाषणाच्या सुरुवातीला ‘भारत माता की जय’चा घोष करताना या घोषणा इतक्या जोरात द्या की, त्यांचा आवाज मुंबईपर्यंत पोहोचला पाहिजे, असे सांगत उद्धव ठाकरे यांना अप्रत्यक्षपणे मुंबई महापालिका निवडणुकांसाठी इशाराच दिला.
राज्यात चालू वर्षी मुंबई, नागपूर पुणे, कोल्हापूरसह सर्व महापालिका, नगर परिषदा आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांत विरोधकांना एकही जागा बसायला मिळणार नाही, याची काळजी भाजप कार्यकर्त्यांना घ्यायची आहे. विकासाची शृंखला तेव्हाच पूर्ण होते जेव्हा पंचायत ते संसद विजय नोंदविला जातो. पंचायत ते पार्लमेंट भाजपच्या विजयाचा भगवा फडकविल्याशिवाय आपला विजय अपूर्ण आहे, असे अमित शहा म्हणाले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही विजयाची पुनरावृत्ती व्हावी या निर्धारानेच तुम्हाला या अधिवेशनात बोलाविले आहे. प्रत्येक जागा जिंकण्याचा संकल्प या श्री साईंच्या शिर्डीत करायचा आहे. प्रत्येक जागा भाजप जिंकण्याचा संकल्प येथून घेऊन जायचा असल्याचे आवाहन अमित शहा यांनी अखेरीस केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढील तीन-चार महिन्यांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या या निवडणुका होणार असल्याचे भाकीत वर्तविले. या निवडणुकांबाबत सर्वाच्च न्यायालयातील याचिका अंतिम टप्प्यात आहे. तीन-चार महिन्यांत या निवडणुका होतील. या निवडणुकांची तयारी आपल्याला करायची आहे. जसा विजय विधानसभेत मिळविला, तसाच महाविजय हा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात मिळवायचा आहे. त्यासाठी सज्ज राहायला हवे, असे आवाहन त्यांनी केले.