

अकोले: अकोले पंचायत समितीत कामानिमित्त गेलेल्या भाऊसाहेब यादव भालेराव रा.खडकी यांना शिवीगाळ करुन अपंग असल्याचे माहित असताना त्यांचा अपमान करुन तु व्हिडीओ शुटींग बंद कर म्हणत दमदाटी केल्याप्रकरणी खडकीच्या ग्रामसेवक जयश्री काशीद,अकोले पंचायत समितीतील विकास चौरे,कैलास येलमामे यांच्या विरोधात अकोले पोलिस स्टेशनमध्ये दिव्यांग कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत भाऊसाहेब यादव भालेराव (वय ३५ रा. खडकी खु॥) यांनी पोलीस स्टेशनमध्ये दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, खडकी खु. या ठिकाणी आई इंदुबाई, वडिल यादव, भाऊ गणपत, भावजयी उज्वला, पुतणे शिवम, पायल, प्रज्ञा असे एकत्र कुटुंबात राहतो. मी दोन्ही पायांनी अपंग असल्याने खडकी गावात झेरॉक्सचे दुकान चालवून माझ्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो. मी व माझ्या सोबत अंकीत राजाराम आव्हाड व संपत भिका भांगरे असे पंचायत समिती अकोले आले होते . त्या वेळी गटविकास अधिकारी माने हे ऑफिसला भेटले नाही.
तेथुन मी समोरच्या केबीन मध्ये बसलेल्या महिला कर्मचारी यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी ते बाहेर भेट दौऱ्यासाठी गेले असल्याचे सांगितले. मला कक्ष अधिकारी कैलास येलमामे यांच्या केबीन मध्ये पाठवले. त्यांना मी माझ्या अडचणी सांगितल्या. त्यांनी ग्रामसेवक जयश्री काशीद यांना फोन करुन अपुर्ण असलेली कागदपत्रे पुर्ण करुन देण्यासाठी बोलवले व माझ्याशी दमदाटी केली. यामुळे मी ग्रामसेवक जयश्री काशीद व पंचायत समितीतील कर्मचारी कैलास येलमामे व विकास चौरे तसेच इतर कर्मचारी यांचे विरुद्ध फिर्याद दिली असे फिर्यादीत म्हटले आहे.
याबाबतचा पुढील तपास पोलीस निरीक्षक मोहन बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हेड काँ. एम. एस. आहेर करीत आहेत.