अहमदनगर, पुढारी वृत्तसेवा : पढेगाव येथे जिल्हा परिषद शाळेमधील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शाळेमध्ये उशिरा अलेल्या विद्यार्थीला शिक्षा केल्यामुळे तिचा मृत्यू झाल्याची खळबळजणक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी पढेगाव जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षक सुनील हांडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तृप्ती भोसले असे मृत विद्यार्थीनीचे नाव आहे. या घटनेबद्दल शुक्रवारी (दि.5) गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
कोपरगाव तालुक्यातील पढेगाव येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणारी तृप्ती भोसले ही 1 एप्रिल 2018 रोजी वर्गात उशिरा आली होती. त्याबद्दल शिक्षा म्हणून तिला शिक्षक हांडे याने वर्गाबाहेर उभे करून धक्का दिला होता. यामध्ये ती पायऱ्यांवर पडून गंभीर जखमी झाली. तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असता, उपचारांदरम्यान तिचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती.
शिक्षकाने दिलेल्या शिक्षेमुळे गंभीर जखमी होऊन माझ्या मुलीचा मृत्यू झाला आहे. या संबंधित शिक्षकाविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करावा, असा तक्रार अर्ज तृप्तीची आई उमा दीपक भोसले यांनी न्यायालयात दाखल केला होता. त्यानुसार न्यायालयाने कोपरगाव पोलिसांना खोलवर तपास करून तसा अहवाल सादर करण्याचा आदेश दिला. त्यावरून शिक्षक हांडे याच्याविरुद्ध शुक्रवारी (5.जुलै) खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.