नगर : श्रीगोंदा येथे पार्किंगमधील चार दुचाकी जाळल्या, शहरात खळबळ

श्रीगोंदा; पुढारी वृत्तसेवा
श्रीगोंदा शहरात आज (गुरूवार) पहाटेच्या सुमारास घरासमोर पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या चार दुचाकी अज्ञात व्यक्तींकडून जाळण्यात आल्या. या दुचाकी कुणी आणि कुठल्या कारणातून जाळल्या याचा श्रीगोंदा पोलीस शोध घेत आहेत.
यामध्ये सावरकर चौक येथे होंडा डीलक्स व बुलेट, तर रत्न कमल मंगल कार्यालय परिसरात बजाज पलसर, ॲक्टिवा या दोन अशा चार दुचाकी जाळण्यात आल्या आहेत. यामध्ये दोन दुचाकी जळून पूर्ण खाक झाल्या आहेत. दुचाकीच्या पेट्रोलची पाईप कापून नंतर दुचाकी पेटवून दिल्या असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, चार दुचाकी अज्ञात व्यक्तीकडून जाळण्यात आल्याचे वृत्त समजताच शहरात एकच खळबळ उडाली आहे. या दुचाकी जाळण्या पाठीमागील नेमके कारण काय? याबाबत आता चर्चेला उधाण आले आहे. श्रीगोंदा पोलिस ठाण्याचे पोलीस कर्मचारी भारत खारतोडे, दादाराम म्हस्के, रविंद्र जाधव घटनास्थळी पोहचले आहेत.
सीसीटीव्ही फुटेज…
सावरकर चौक परिसरात ज्या ठिकाणी दुचाकी जाळण्यात आल्या आहेत, त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे असून, श्रीगोंदा पोलीस सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत.