कर्जत नगरपंचायतमध्ये राष्ट्रवादीची एन्ट्री अन्‌ राम शिंदेंचे मौन धारण करून मंदिरासमोर आंदोलन | पुढारी

कर्जत नगरपंचायतमध्ये राष्ट्रवादीची एन्ट्री अन्‌ राम शिंदेंचे मौन धारण करून मंदिरासमोर आंदोलन

कर्जत; पुढारी वृत्तसेवा

कर्जत नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने खाती उघडले आहे. कर्जत नगरपंचायतमध्ये प्रभाग दोनमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार लंकाबाई देविदास खरात या बिनविरोध निवडून आल्या आहेत. त्यांच्या विरोधात असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या विद्यमान नगरसेविका नीता आजिनाथ कचरे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला.

आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. प्रभाग 2 मधून राष्ट्रवादीच्या लंकाबाई देविदास खरात या बिनविरोध विजयी झाल्या. हा उमेदवार विजयी होण्यामध्ये या प्रभागाचे निरीक्षक दीपक शिंदे, याचप्रमाणे श्रीमंत शेळके व अजित फाळके यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

विजयी उमेदवार लंकाबाई देविदास खरात यांचा सत्कार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केला. व लोकशाही मार्गाने आगामी सर्व जागांवर विजय मिळवू असा विश्वास यावेळी रोहित पवार यांनी बोलताना व्यक्त केला।

रोहित पवारांनी दडपशाही केली : राम शिंदे

कर्जत नगरपंचायत निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी दडपशाही करून उमेदवारी अर्ज मागे घेण्यास भाजपच्या उमेदवाराला भाग पाडले अशी टीका माजी मंत्री राम शिंदे यांनी केली. त्यांनी येथील ग्रामदैवत गोदड महाराज मंदिरासमोर मौन धारण करून धरणे आंदोलन सुरू केले.

कर्जत नगरपंचायत निवडणुकीमध्ये आज दिवसभरात अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. भारतीय जनता पक्षाच्या विद्यमान नगरसेविका नीता कचरे यांनी प्रभाग 2 मधून उमेदवारी अर्ज काढून घेतला होता. हा अर्ज दडपशाही करून काढण्यात आला आहे अशी टीका माजी मंत्री राम शिंदे यांनी करत भाजप कार्यकर्त्यांसह मौन धरणे आंदोलन सुरू केले.

हे ही वाचलं का ?

Back to top button