पाथर्डी तालुका : पुढारी वृत्तसेवा : गेल्या आठ दिवसांपासून उष्णतेमध्ये तीव्र वाढ झाल्याने लोकांच्या शरीराची लाही लाही होत आहे. सकाळी अकरा वाजल्यापासूनच उष्णतेची तीव्रता जाणवायला सुरुवात होते. सायंकाळी साडेपाचनंतरही सूर्य आग ओकत आहे. सायंकाळी सहानंतरही जमिनीतून उष्णतेच्या झळा बसत आहेत. दुपारनंतर पाथर्डी शहरासह तालुक्यातील बाजारपेठ व रस्त्यांवर संचारबंदीचे चित्र निर्माण होत आहे.
या काळात लोक उन्हाच्या कडाक्यामुळे रस्त्यावर येत नाही. माणसाच्या शरीरातूनही उष्णता बाहेर पडू लागली आहे. तोंड येणे, अंगावर पुटकुळ्या येणे याच्यासह लोकांना ताप, पोटदुखी, अशक्तपणा, उदासीनता निर्माण होणे असे अनेक आजार जडत आहे. तापमान एवढे प्रचंड वाढले की, दुपारी, तसेच सायंकाळी झोपताना कुलरची हवासुद्धा वाढत्या तापमानापुढे आता कमी पडू लागली आहे. रात्री घरात झोपताना गर्मीने लोकांची झोप उडून गेली आहे. त्यात विजेचा खेळखंडोबा गेल्या दोन दिवसांपासून सुरू झाल्याने हवा देणारी उपकरणे बंद पडल्याने आबालवृद्धांचे हाल होत आहेत. शरीराची उष्णता कमी करण्यासाठी थंड पेय पदार्थांचा अधिक वापर सध्या लोक करत आहेत. माणसासह प्राण्यांना व झाडांना या तीव्र उन्हाचा फटका बसला आहे.
उन्हाची तीव्रता असल्यामुळे माणसे घराबाहेर पडत नाही. प्राणीसुद्धा सावलीचा शोध घेऊन विसावा घेतात. झाडांना तर मोठा फटका वाढत्या उष्णतेचा होत असून, झाडांना सध्या असलेली फळेसुद्धा अतिउष्णतेने खराब पडत आहे. या उष्णतेपासून झाडांना व फळांचा बचाव करण्यासाठी शेतकर्याने झाडांना कपड्याचे आच्छादन टाकून उष्णतेपासून बचाव करण्याचा प्रयत्न केला आहे. शेतकर्यांनाही तीव्र उष्णतेची झळ बसल्याने खरीप हंगाम पूर्व पिकाच्या नियोजनासाठी शेतीतील कामे करता येत नाहीत.
फळविक्रेते, हातगाडी व्यावसायिक, भाजीपाला विकणारे शेतकरी व हातगाडी विक्रेत्यांचे मोठे हाल वाढत्या तापमानाने होत आहे. त्यामुळे आपल्या दुकानांपुढे ऊन चटकूनये म्हणून हिरव्या रंगाची उन्हापासून बचाव करणारे कापड ठिकठिकाणी व्यापार्यांनी स्वखर्चातून बांधले आहे. त्यामुळे ग्राहकांबरोबर व्यापार्यांना उन्हाच्या तीव्रतेचा कमी प्रमाणात सामना करावा लागत असल्याने ही बाजारपेठ टप्प झाली आहे.
गेल्या आठ दिवसांपासून तालुक्यात उष्णता मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे अनेक त्रास लोकांना उद्भवत असून, महत्त्वाचे काम असल्यावरच घराबाहेर पडा.
– डॉ. श्रीधर देशमुख
हेही वाचा