मराठा आंदोलकांच्या गनिमी काव्याने नारायण राणेंना घेरले ! दाखविलेे काळे झेंडे | पुढारी

मराठा आंदोलकांच्या गनिमी काव्याने नारायण राणेंना घेरले ! दाखविलेे काळे झेंडे

नगर : पुढारी वृत्तसेवा : केंद्रीय मंत्री नारायण राणे शुक्रवारी सामूहिक सुविधा केंद्राच्या भूमिपूजनासाठी आले असता नगरमध्ये मराठा आंदोलकांनी त्यांना काळे झेंडे दाखवून रोष व्यक्त केला. पोलिसांनी दोन ठिकाणी आंदोलकांना ताब्यात घेऊन कायदेशीर कारवाई करून सोडून दिले. मराठा संघर्षयोद्धा मनोज जरांगे यांच्या विरोधात व्यक्तव्य केल्याने मंत्री राणे यांच्याबद्दल मराठा समाजात संतापाचे वातावरण आहे. नगर तालुक्यातील अकोळनेर येथे सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालयाच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या सामूहिक सुविधा केंद्राचे भूमिपूजन शुक्रवारी (दि. 8) केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते झाले.

त्यासाठी नारायण राणे नगरमध्ये आले होते. त्यांच्या विरुद्धचा संताप व्यक्त करण्यासाठी मराठा आंदोलक सकाळपासूनच चौकाचौकात कार्यकर्ते उभे होते. मंत्री राणे नगरमध्ये येण्याआधीच पोलिस मुख्यालयासमोर मराठा आंदोलक जमले होते. पोलिसांनी सतर्कता दाखवीत आंदोलक माजी नगरसेवक मदन आढाव, अ‍ॅड. गजेंद्र दांगट यांच्यासह पाच ते सहा कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. दरम्यान, राणे दुपारी हेलिकॉप्टरने पोलिस मुख्यालय मैदानावर उतरले. त्यांच्या वाहनांचा ताफा तेथून लालटाकी, सिव्हील हॉस्पिटल, डीएसपी चौकामार्गे उड्डाणपुलावरून अकोळनेरकडे निघाला होता. मराठा आंदोलक गोरख दळवी यांनी गमिनी कावा करीत कार्यकर्त्यांसह शिल्पा गार्डन परिसरात दडून बसले होते. मंत्री नारायण राणे यांच्या वाहनांचा ताफा जवळ येताच रस्त्यावर येऊन काळे झेंडे दाखविले. मंत्री राणे यांचा निषेध करीत एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देत आंदोलकांनी संताप व्यक्त केला.

नगर-पुणे रस्त्यावर मंत्री राणे यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखविणारे मराठा आंदोलक गोरख जगन्नाथ दळवी (रा. सोनेवाडी, ता.नगर), किशोर सूर्यकांत शिंदे (रा. गांधी मैदान, नगर), सिद्धांत गोरख पानसरे(रा. हिंगणगाव, ता. नगर), नवनाथ अर्जुन काळे (रा. नवनागापूर) यांना कोतवाली पोलिसांनी ताब्यात घेऊन कायदेशीर प्रक्रिया केल्यानंतर सोडून दिले. दरम्यान, तोफखाना पोलिसांनी मंत्री राणे यांना काळे झेंडे दाखविण्याच्या प्रयत्नात असणारे माजी नगरसेवक मदन आढाव, अ‍ॅड. गजेंद्र दांगट, स्वप्नील दगडे यांच्यासह काही तरुणांनाही ताब्यात घेऊन नंतर सोडून दिले.

काळे झेंडे दाखविणार्‍यांनी पुढे आले पाहिजे. मला कळेल तरी ते कोण आहेत. मला काळे झेंडे दाखविलेच नाहीत.

– नारायण राणे, केंद्रीय मंत्री

हेही वाचा

 

Back to top button