पाटबंधारेच्या हलगर्जीपणानेे पाणीबाणी; चिचोंडीतील ग्रामस्थांची तहान कशी भागणार?

पाटबंधारेच्या हलगर्जीपणानेे पाणीबाणी; चिचोंडीतील ग्रामस्थांची तहान कशी भागणार?

चिचोंडी पाटील : पुढारी वृत्तसेवा : नगर तालुक्यातील वेगाने विकसित होत असलेल्या चिचोंडी पाटील या गावाला पाटबंधारे विभागाच्या हलगर्जीपणामुळे उन्हाळ्याच्या सुरूवातीलाच पाणी टंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागण्याची वेळ येणार आहे. चिचोंडी पाटील गावाला केळ तलावातून पिण्याचा पाणीपुरवठा केला जातो. तलावातून उचललेले पाणी चिचोंडी गावात उभारण्यात आलेल्या जलशुद्धीकरण यंत्रणेद्वारे गावात वितरित केले जाते. सध्या उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील अनेक नद्या, नाले, विहिरींचे पाणी कमी झाले असून, इतर स्त्रोतदेखील कोरडे पडत आहेत.

परिसरात पाणी नसल्याने, तसेच केवळ या तलावात पाणी उपलब्ध असल्याने या भागातील अनेक शेतकर्‍यांनी या तळ्यात वीजपंप बसवून मोठ्या प्रमाणात पाणी उपसा केला आहे. त्यामुळे तलावातील पाणीसाठा झपाट्याने घटत चालला आहे. परिणामी गावाला पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे. याबाबत चिचोंडी ग्रामपंचायतीच्या वतीने पाटबंधारे विभागास यापूर्वीच वारंवार लेखी पत्र देवून तलावावर कर्मचार्‍यांची नेमणूक करून पाणीउपसा बंद करण्याबाबत, तसेच या भागातील वीजपुरवठा खंडीत करण्याबाबत सूचित केले होते.

मात्र, या विभागाच्या अधिकार्‍यांनी या गोष्टीकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष केल्याने आजमितीला तलावात अत्यल्प पाणीसाठा शिल्लक असून, तो जेमतेम महिनाभर पुरू शकतो. त्यानंतर मात्र ग्रामस्थांना पाण्यासाठी टँकरवर अवलंबून रहावे लागणार आहे. पाटबंधारे विभागाच्या अधिकार्‍यांनी ग्रामपंचायतीने वेळोवळी दिलेल्या पत्रांची गांभीर्याने दखल घेवून पाणीउपसा रोखला असता तर, आज तलावात पुरेसे पाणी उपलब्ध असते. ग्रामस्थांना उन्हाळ्यात पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली नसती.

शासनाच्या हेतूला अधिकार्‍यांचा फाटा

शासनाने कोट्यवधी रूपये खर्चून गावाला नैसर्गिक शुद्ध पाणीपुरवठा होण्यासाठी जलशुद्धीकरण यंत्रणा बसविली. मात्र, आता तलावातच पाणी नसल्याने ही यंत्रणा धूळखात पडणार आहे. एकीकडे शासन नागरिकांना पिण्यासाठी शुद्ध पाणी मिळण्यासाठी कोट्यवधी रूपये खर्च करते. मात्र, अधिकारीच शासनाच्या मुख्य हेतूलाच फाटा देतात.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news