पंचायत समितीत भरली शाळा! शिक्षकांची बदली झाल्याने पालकांचे आंदोलन | पुढारी

पंचायत समितीत भरली शाळा! शिक्षकांची बदली झाल्याने पालकांचे आंदोलन

श्रीगोंदा : पुढारी वृत्तसेवा : श्रीगोंदा शहरातील सिद्धार्थनगर व वडघुल येथील प्रत्येकी एका शिक्षकाची समायोजनात बदली झाल्याने, पालकांनी मंगळवारी चक्क श्रीगोंदा पंचायत समिती आवारातच शाळा भरविली. समायोजनात बदली झालेल्या शिक्षकांना नवीन शिक्षक येईपर्यंत जागेवरच ठेवा, अशा सूचना शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांनी दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. श्रीगोंदा तालुक्यात जिल्हा परिषदेच्या 364 प्राथमिक शाळा असून, मुख्याध्यापक 9, पदवीधर 20, तर उपशिक्षकांच्या 30 जागा रिक्त आहेत.

तसेच, केंद्रप्रमुखांच्या 16 जागा रिकाम्या आहेत. त्यामुळे शिक्षकांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अशा परिस्थितीत सर्व शाळांना विद्यार्थी संख्येच्या प्रमाणात न्याय देण्यासाठी गटशिक्षणाधिकारी अनिल शिंदे व त्यांची टीम प्रयत्न करीत आहेत. मात्र, पालकांचा उद्रेक होत आहे. सिद्धार्थनगर शाळेत पहिली ते सातवीच्या वर्गात पाच शिक्षक होते. पण, अवघे चार शिक्षक राहिले आहेत. त्यामध्ये एका शिक्षकाची समायोजनात हंगेश्वर क्लास, हंगेवाडी येथे बदली झाली. तीच परिस्थिती वलघुडची आहे. परीक्षा जवळ आल्या आहेत. अशा परिस्थितीत शिक्षकांच्या बदल्या केल्या जात आहेत. या चुकीच्या धोरणामुळे शिक्षण विभागास रोष पत्करावा लागत असल्याची वस्तुस्थिती आहे.

सिद्धार्थनगर शाळेला गटविकास अधिकारी राणी फराटे, गटशिक्षणाधिकारी अनिल शिंदे यांनी नेहमी सहकार्य केले. पण, परीक्षेच्या तोंडावर आमचे शिक्षक कायम ठेवा, अशी आमची मागणी आहे. परीक्षा झाल्यानंतर जून महिन्यात नवीन शिक्षक द्या.

– हृदय घोडके, श्रीगोंदा

पदवीधर मुख्याधापक व उपशिक्षकांची 59 पदे रिक्त आहेत. अशा परिस्थितीत जिल्हा शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शाळांना विद्यार्थी संख्येच्या प्रमाणात न्याय कसा देता येईल याकडे लक्ष दिले जात आहे. पालकांनी सहकार्य करावे.

– अनिल शिंदे, प्रभारी गट शिक्षणाधिकारी

हेही वाचा

Back to top button