नगर : पुढारी वृत्तसेवा
नगर – औरंगाबाद महामार्गावरील जेऊर शिवारातील जरे वस्ती जवळ आज (शुक्रवार) पहाटेच्या सुमारास नरभक्षक बिबट्याचा अपघातात मृत्यू झाला आहे. सकाळी ही घटना उघडकीस आली असून वन विभागाने घटनास्थळी पंचनामा केला आहे
नगर तालुक्यातील जेऊर परिसरातील वाड्या वस्त्या व डोंगर परिसरात मागील दोन महिन्यांपासून बिबट्या दर्शन देत होता. तीन शेळ्या व एका कुत्र्याचा त्याने फडशाही पाडला होता. त्यामुळे जेऊरकरांमध्ये बिबट्याच्या दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते.
ग्रामस्थांनी बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावण्याची मागणी केली होती. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी परिसराची पाहणी केली होती. बिबट्याच्या पावलाच्या ठशावरून त्याचे वास्तव्य असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यामुळे वन विभागाने काळजी घेण्याचे आवाहन केले होते.
आज पहाटे या नरभक्षक बिबट्याचा अपघातात मृत्यू झाला. अखेर भीतीच्या सावटाखाली असलेल्या जेऊरकरांनी सुटकेचा निश्वास टाकला. वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.