स्व. नागवडेंमुळे श्रीगोंदा तालुक्याचा विकास : उपमुख्यमंत्री अजित पवार | पुढारी

स्व. नागवडेंमुळे श्रीगोंदा तालुक्याचा विकास : उपमुख्यमंत्री अजित पवार

काष्टी : पुढारी वृत्तसेवा : स्व. यशवंतराव चव्हाण यांचे निष्ठावंत समर्थक असणारे सहकाराचे गाढेे अभ्यासक स्व.शिवाजीबापू नागवडे यांचे सहकार आणि शिक्षण क्षेत्रात मोठे योगदान आहे. त्यामुळेच श्रीगोंदा तालुक्यात क्रांती होऊन सामान्य जनतेचा विकास झालेला दिसत आहे, असे उद्गार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काढले. श्रीगोंदा तालुक्यातील ढोकराई येथे शुक्रवारी (दि.19) स्व.शिवाजीराव नागवडे यांचा 90 वा जयंती सोहळा उपमुख्यमंत्री पवार यांच्यासह राज्यातील विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नागवडे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे होते.

यावेळी आमदार बबनराव पाचपुते, आमदार संग्राम जगताप, आमदार नीलेश लंके, माजी आमदार रमेश थोरात, जिल्हा बँकेच्या संचालिका अनुराधा नागवडे, मुंबई बाजार समितीचे सभापती बाळासाहेब नाहाटा, युवक नेते दीपक नागवडे, प्रशांत गायकवाड, सीताराम गायकर, भगवानराव पाचपुते, कैलासराव पाचपुते, राजेंद्र गुंड, दादासाहेब फराटे, नगराध्यक्ष शुभांगी पोटे, राजेंद्र मस्के, कुंडलिक दरेकर, अरूणराव पाचपुते यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, मी सत्तेला हपापलेला कार्यकर्ता नाही. राज्यातील जनतेचे प्रश्न सुटले पाहिजेत. त्यांचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे, यासाठी मी काम करतोय. प्रत्येक क्षेत्रात विकास व्हावा, अशा जनतेच्या अपेक्षा वाढल्या आहेत. मोठमोठी कामे करताना भ्रष्टाचाराचे आरोप होतात. म्हणून विकास करायचा नाही का? सहकारी साखर कारखानदारी चालविताना मोठ्या संकटांना सामोरे जावे लागते. राज्यात साखर कारखान्यांची संख्या जास्त आणि उसाची संख्या कमी झाली आहे. ऊस तोडणीचा प्रश्न गंभीर झाल्याने आता यांत्रिक मशीनद्वारे ऊस तोडणी करणे गरजेचे झाले आहे.

श्रीगोंदा तालुक्याला आपण कायम विकासकामासाठी झुकते माप दिले आहे. यापुढेही निधी कमी पडणार नाही. यापुढे नागवडे कुटुंब यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली. परंतु, यावेळी त्यांनी तालुक्यातील राजकीय घडामोडींवर बोलणे टाळले.
राजेंद्र नागवडे म्हणाले, स्व.बापूंनी तालुक्यातील जनता केंद्रस्थानी मानून विकास केला. सहकार आणि शिक्षण क्षेत्रातून सामान्य जनतेचे जीवनमान उंचावले. म्हणूनच सामान्य जनता आमच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. सन 2019 मध्ये विधानसभेची निवडणूक लढण्याची इच्छा असताना लढलो नाही. ही आमची चूक झाली. आमच्या कार्यकर्त्यांची निरशा झाली. परंतु, आगामी विधानसभा निवडणूक अनुराधा नागवडे या पूर्ण ताकदीने लढविणार आहेत. यासाठी आपली ताकद आमच्या पाठीशी राहू द्या, असे साकडे नागवडे यांनी घातले.
यावेळी आमदार बबनराव पाचपुते, बाबासाहेब भोस यांनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रा. शंकर गवते यांनी सूत्रसंचालन केले. संचालक सुभाष शिंदे यांनी आभार मानले.

वाचाळवीरांना विकास दिसत नाही

आम्ही विकास करतोय, परंतु, अनेक जण नाव ठेवतात. सध्या वाचळवीर वाढले आहेत. सकाळी उठले की त्यांचा भोंगा सुरू होतो, अशी टीका उपमुख्यमंत्री पवार यांनी संजय राऊत यांचा नामोल्लेख टाळून केली. नरेंद्र मोदींमुळे देश प्रगतिपथावर चालला आहे. राज्यातही मोठी प्रगती झाली आहे. नितीन गडकरी यांच्यामुळे रस्त्याचे मोठे जाळे तयार झाले आहे. हा विकास दिसत नाही का? असा सवाल त्यांनी केला.

घटनेत बसणारे आरक्षण देणार

राज्यात आरक्षणाचा प्रश्न गाजत आहे. परंतु, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेत दिलेले सर्व जाती धर्मांना टिकेल, असे आरक्षण मिळाले पाहिजे, हा आमच्या सरकारचा उद्देश आहे. परंतु, काही जण हट्टालाच पेटले आहेत. आमचे सरकार या चौकटीत बसेल, असे आरक्षण देणार आहे. यासाठी आमचे प्रयत्न चालू आहे, असेही पवार म्हणाले.

हेही वाचा

Back to top button