Nagar : एमआयडीसीचे गिफ्ट देणार : आ. प्रा. राम शिंदे | पुढारी

Nagar : एमआयडीसीचे गिफ्ट देणार : आ. प्रा. राम शिंदे

कर्जत : पुढारी वृत्तसेवा : नवीन वर्ष सुरू झाले आहे. अनेक नवीन व चांगल्या घटना घडत आहेत. कर्जत-जामखेड मतदारसंघातील जनतेलाही हे नवीन वर्ष अतिशय चांगले जाणार आहे. माझ्याकडून मतदारसंघातील जनतेला सन 2024चे गिफ्ट म्हणून एमआयडीसी देणारच, असे आश्वासन आ. प्रा. राम शिंदे यांनी हजारो नागरिकांच्या उपस्थितीत दिले. येथे महेश तनपुरे, प्रवीण घुले पाटील मित्र मंडळ व राजमाता जिजाऊ प्रतिष्ठानतर्फे होम मिनिस्टर व आ. राम शिंदे यांचा अभिष्टचिंतन सोहळा कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

या कार्यक्रमासाठी सिनेअभिनेत्री व नृत्यांगना मानसी नाईक, अभिनेत्री रूपाली भोसले व विनोदी अभिनेता प्रियदर्शन जाधव यांची विशेष उपस्थिती होती. या वेळी आ. शिंदे यांच्या पत्नी आशा, जयदत्त धस, प्रवीण घुले, मोहिनी घुले, संयोजक महेश तनपुरे, महेंद्र धांडे, विलास निकत, विनोद दळवी आदी उपस्थित होते. या वेळी सिनेतारका मानसी नाईक व रूपाली भोसले यांनी अनेक गाण्यांवर नृत्य केले. या वेळी टाळ्या-शिट्ट्यांनी परिसर दणाणून गेला होता. सिने अभिनेते प्रियदर्शन जाधव यांनी सूत्रसंचालन केले. ते या वेळी भाऊजी झाले होते आणि पैठणीचा खेळ रंगला होता.

या कार्यक्रमात हेमलता मिसाळ(दुचाकी), स्वाती मरळ (वॉशिंग मशीन), जयश्री उकरडे (फ्रीज) यांनी बक्षिसे मिळविली. याशिवाय 20 सोन्याच्या नथ व 20 पैठणी विजेत्यांना बक्षीस म्हणून देण्यात आले. या वेळी आ. शिंदे म्हणाले की, आता सर्व मतदारसंघातील जनतेच्या लक्षात आले आहे की शेवट आपला तो आपलाच हक्काचा असतो, जनतेलाही त्याची प्रचिती आली असून, दि. 22 रोजी होणार्‍या राम मंदिर कार्यक्रमानिमित्त घरोघरी दिवाळी साजरी करा, असे आवाहन त्यांनी या वेळी केले.

या वेळी प्रवीण घुले यांचे भाषण झाले. संयोजक महेश तनपुरे आणि विलास निकत यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी अमोल कदम, राजू बागवान, अमोल भगत, भोप्या भाई सय्यद, गणेश वाळुंजकर, मुन्नाभाई काझी, दादासाहेब सुरवसे, रिकी पाटील, जय गोहेर, दीपक बोराटे, रामभाऊ जागीरदार, सौरभ पाटील, शिवम कांबळे, गणेश क्षीरसागर आदींनी परिश्रम घेतले.

हेही वाचा

Back to top button