अकोले तालुक्यात ‘रोहयो’द्वारे 1215 विहिरींचे उद्दिष्ठ; 330 विहिरींची नोंदणी | पुढारी

अकोले तालुक्यात ‘रोहयो’द्वारे 1215 विहिरींचे उद्दिष्ठ; 330 विहिरींची नोंदणी

अकोले : पुढारी वृत्तसेवा : म. गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत मिशन मोडवर ‘हर खेत पाणी’ या संकल्पनेतून शेतकर्‍यांची शेती समृद्ध करण्यासाठी सिंचन विहिरीस 4 लाख रुपयांचे अनुदान मिळणार आहे. यापुर्वी विहिरीसाठी अनेक जाचक अटी कमी करून आता विहीर मंजूर केली जात आहे. शेतकर्‍यांचा सिंचनाकडे वाढता कल पाहता शेतात विहीर खोदण्यासाठी तालुक्याला 1215 विहिरींचे उदिष्ठ दिले आहे. दरम्यान, 330 विहिरींची शासनाच्या अ‍ॅपवर नोंदणी झाली आहे. यापैकी 6 कामे सुरू झाली आहेत.

राज्यात अर्ध्याहुन अधिक लोकसंख्या उदरनिर्वाहासाठी शेतीवर अवलंबून आहे. राज्य शासनाकडून शेतीमधून चांगले उत्पादन मिळविण्यासाठी विहीर अनुदान योजना राबवली जात आहे. म. गांधी राग्रारोह योजनेंतर्गत पंचायत समितीच्या नरेगा विभागामार्फत तालुक्यात प्रत्येक गावात विहिरी दिल्या जाणार आहे. यामुळे सिंचनाचा अनुशेष दूर होण्यास फार मोठी मदत होणार आहे. मनरेगांतर्गत या विहिरी लवकर खोदल्यास, उपलब्ध पाण्याचा किफायतशीर वापर केल्यास शेतकर्‍यांना फायदा होईल.

अकोले तालुक्यात 81 गावे ‘सेफ झोन’मध्ये आहेत. शेतकरी वैयक्तीक लाभ घेऊ शकतात. या व्यतिरिक्त जी गावे क्रिटीकल व सेमी क्रिटीकल गटात येतात, तेथे वैयाक्तिक लाभाची विहीर घेता येत नाही. याकरीता या गावांना सामुहिक विहीर खोदण्यासाठी अर्ज करता येणार आहे. लाभार्थ्यांकडे किमान 0.40 आर क्षेत्र असावे, लाभधारकाच्या 7/12 वर याआधीच विहिरीची नोंद नसावी, लाभधारकाकडे एकूण क्षेत्राचा दाखला असावा, एकत्रित विहीर हवी असल्यास सलग जमिनीचे क्षेत्र 0.40 हेक्टर पेक्षा जास्त असावे. निकषानुसार लाभाथ्यांची निवड करून 6 कामे सुरू झाली.

अनूसूचित जाती-जमाती, भटक्या विमुक्त जाती-जमाती, दारिद्य्ररेषेखालील, दिव्यांग, अल्पभूधारकांना म. गांधी रोहयोतून विहिर खोदण्यास 4 लाख रुपये अनुदान मिळते. ‘मनरेगा’ अंतर्गत विहीर योजनेचा लाभ घेण्यास ग्रामपंचायतीकडे अर्ज करावा. ग्रामसेवक योजनेची माहिती देतात. पात्र लाभार्थ्यास अडचण आल्यास रोहयो कक्षाशी संपर्क साधावा.

– पांडुरंग कोल्हे, ग. वि. अधिकारी, अकोले

हेही वाचा

Back to top button