Nagar Crime News : जबरी चोरीच्या गुन्ह्यात दोघे गजाआड | पुढारी

Nagar Crime News : जबरी चोरीच्या गुन्ह्यात दोघे गजाआड

नगर : पुढारी वृत्तसेवा : पळशी (ता. पारनेर) येथे शेतवस्तीवरील घराचा दरवाजा उचकटून जबरी चोरीच्या गुन्ह्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दोघांना जेरबंद केले. त्यांच्याकडून 2 लाख 40 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. टोळी अन्य आरोपींची नावे निष्पन्न झाली. अनिकेत विलास हुलावळे (वय 19, रा. पळशी, ता. पारनेर), गणमाळ्या संदल चव्हाण (रा. वासुंदे, ता. पारनेर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. अधिक माहिती अशी, प्रभाकर आण्णा गागरे (रा. पळशी, ता. पारनेर) हे घराचे पडवीत झोपलेले असताना अनोळखी चार जणांनी लोखंडी सळईने ग्रिलचा दरवाजा उचकटून आत प्रवेश केला.

प्रभाकर गागरे यांना सळईने मारहाण करून घरातील सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईल रोख रक्कम असा दोन लाख 10 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. याबाबत गागरे यांच्या फिर्यादीवरून पारनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. या गुन्ह्याचा समांतर तपास सुरू असताना रेकॉर्डवरील गुन्ह्यांची माहिती देण्याच्या सूचना पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी दिल्या. त्यानुसार माहिती घेत असताना पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांना माहिती मिळाली की, वरील गुन्हा अनिकेत हुलावळे व त्याच्या साथीदारांनी केला आहे. तो सध्या टाकळी ढोकेश्वर येथे येणार आहे. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने टाकळी ढोकेश्वर येथे सापळा लावला असता अनिकेत विलास हुलावळे याला ताब्यात घेतले.

त्याच्याकडे विचारपूस केली असता कबीर ऊर्फ कबर्‍या काळे (फरार), अक्षय काळे (फरार) (दोघे रा. सुरेगाव, ता. श्रीगोंदा), साईनाथ जाधव (रा. घोसपुरी, ता. नगर (फरार)) व गणमाळ्या संदल चव्हाण (रा. वासुंदे, ता. पारनेर) यांनी मिळून केल्याची कबुली दिली. त्यानंतर अन्य आरोपींचा शोध घेत असताना गणमाळ्या संदल चव्हाण रा. वासुंदे, ता. पारनेर याला पकडण्यात पोलिसांना यश आले. अन्य आरोपी अद्यापि पसार आहेत. ही कारवाई पोलिस उपनिरीक्षक सोपान गोरे, सहायक फौजदार भाऊसाहेब काळे, पोलिस कर्मचारी दत्तात्रय हिंगडे, मनोहर गोसावी, बापूसाहेब फोलाणे, अतुल लोटके, देवेंद्र शेलार, रविंद्र कर्डिले, गणेश भिंगारदे, संतोष खैरे, मच्छिंद्र बर्डे, आकाश काळे, मेघराज कोल्हे, प्रशांत राठोड, उमाकांत गावडे, अरुण मोरे यांच्या पथकाने केली.

हेही वाचा

दुग्धविकास मंत्र्यांना दुग्धाभिषेक घालणार : दूधउत्पादनकांचा इशारा

कच्च्या हळदीचा वापर हिवाळ्याच्या दिवसांमध्ये अधिक लाभदायक

रंगभूमीची दारे माझ्यासाठी पुणेकरांनी उघडली : दिग्दर्शक पुरुषोत्तम बेर्डे

Back to top button