| सिंदखेडराजा पतसंस्थेत ६७ लाखांची फसवणूक
शेवगाव : पुढारी वृत्तसेवा
सिंदखेडराजा पतसंस्थेच्या चेअरमनसह संचालक मंडळावर ६७ लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी शेवगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मातृतीर्थ सिंधखेडराजा अर्बन को. ऑप क्रेडिट सोसायटीच्या शेवगाव शाखेत या संस्थेच्या चेअरमन व संचालक मंडळाने जादा परताव्याचे आमिष दाखवून ६७ लाख ४० हजार रुपयांची फसवणूक केल्याची फिर्याद शरद दामोधर भांडेकर (रा. माजलगाव, जि. बीड) यांनी दिली.
या प्रकरणी शेवगाव पोलिसांनी चेअरमन दीपकसिंह बाबूसिंग चव्हाण, तसेच संचालक दिलीप गोपाळराव वाघमारे, मोहन रुस्तुम माघाडे, गजानन उत्तमराव कुहिरे, राजू रंगनाथ मेहेत्रे, प्रकाश गोबरा राठोड, लक्ष्मणराव नानासाहेब भोसले, नीता मोहन माघाडे, सविता नीलेश भोसले, नीलेश रंगनाथ भुतेकर, उध्व उत्तम गव्हाड (सर्व सिंदखेडराजा, जि. बुलढाणा) यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत शरद भांडेकर यांनी फिर्यादीत म्हटले की डिसेंबर २०२३ मध्ये मित्र संजय घाडगे व रवी राठोड यांच्यामार्फत मातृतीर्थ सिंदखेडराजा अर्बन को. ऑप क्रेडिट सोसायटीच्या शेवगाव शाखेत संस्थेचे चेअरमन दीपकसिंग चव्हाण माजलगावात येऊन मला भेटले. तुम्ही आमच्या पतसंस्थेत मुदत ठेवची गुंतवणूक करा, आम्ही तुम्हाला १० ते १५ टक्के वार्षिक व्याजदर देऊ, असे सांगितले.
त्यावर विश्वास ठेवून ७ डिसेंबर २०२३ रोजी पत्नी संध्या भांडेकर हिच्या नावे ४ लाख, मुलगा शार्दुलच्या नावे ४ लाख, स्वतःच्या नावे ४ लाख, मेव्हणे सुवर्णा वंनकुंद्रे यांच्या नावे ३ लाख अशी १५ लाख रुपयांची ११ टक्के व्याजदराने एक वर्ष मुदत ठेव गुंतवणूक केली. त्यानंतर मार्च २०२४ मध्ये मित्र संजय घाडगे व रवी राठोड यांनी शेवगाव शाखा बंद होऊन संचालक मंडळ पसार झाल्याची माहिती दिली.
याबाबत अधिक चौकशी करता, फसवणूक झालेल्यांत गणेश श कुलकर्णी १५ लाख, शामल साडेगावकर २ लाख, अर्जुन कराळे ३ लाख, राजेंद्र कराळे २ लाख, शिवाजी कराळे २ लाख, योगेश जाधव ५ लाख, सुरेश लांडे १३ लाख, प्रवीण लांडे ११ लाख, कानिफनाथ घनवट ७ लाख ४० हजार, ज्योती वंजारी ७ लाख यांचा समावेश असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.