Maharashtra Assembly Poll| विधानसभेसाठी जिल्ह्यात ३७.६० लाख मतदार

आल्यास कटक कारवाई करण्याची जिल्हाधिकाऱ्यांची तंबी
Maharashtra Assembly Poll
Maharashtra Assembly PollFile Photo
Published on
Updated on

नगर : पुढारी वृत्तसेवा

विधानसभा निवडणुकीसाठी जिल्हाभरात आचारसंहिता लागू झाली असून निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन होण्यासाठी प्रत्येक विधानसभा मतदारसंघात भरारी पथके कार्यान्वित करण्यात आली आहेत. बारा मतदारसंघांसाठी जिल्हाभरात ३ हजार ७६३ मतदान केंद्र, तर ३७ लाख ६० हजार ५१२ मतदार आहेत.

लोकसभा निवडणुकीनंतर मतदारसंख्येत जवळपास १ लाखांची वाढ झाल्याचे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी सांगितले. दरम्यान, निवडणूक प्रक्रियेत कोणताही गैरप्रकार चालणार नाही. याबाबत कोणी आढळल्यास कडक कारवाई केली जाणार असल्याचा इशारा त्यांनी दिला.

भारत निवडणूक आयोगाने मंगळवारी विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. त्यानंतर जिल्हाधिकारी सालीमठ यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, जिल्हा पोलिस अधीक्षक ओला, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल पाटील, नायब तहसीलदार प्रशांत गोसावी आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी सालीमठ म्हणाले की, लोकसभा निवडणुकीसाठी ३ हजार ७३१ मतदान केंद्र होते. त्यानंतर आयोगाच्या निर्देशानुसार आणखी ३२ मतदान केंद्र निर्माण करण्यात आले आहेत. शेवगाव मतदारसंघात सर्वाधिक ३६८ तर कोपरगाव मतदारसंघात सर्वात कमी २७० मतदान केंद्र आहेत.

एकूण मतदान केंद्रांच्या ५० टक्के म्हणजे १ हजार ८८४ मतदान केंद्रांचे वेबकास्टिंग करण्यात येणार आहे. मतदान प्रक्रिया राबविण्यासाठी ८ हजार ७७९ बीयू, ४ हजार ७७९ सौयू आणि ५ हजार १५५ व्हीव्हीपॅट उपलब्ध करण्यात आले आहेत.

लोकसभा निवडणुकीसाठी ३६ लाख ५९ हजार मतदार होते. साडेचार महिन्यांत जवळपास १ लाख नवीन मतदारांची भर पडली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील १२ मतदारसंघांसाठी आता ३७ लाख ६० हजार ५१२ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यामध्ये १८ लाख २३ हजार ४११ महिला तर २०१ इतर मतदारांचा समावेश आहे.

प्रत्येक विधानसभा मतदारसंघासाठी उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्यांची निवडणूक निर्णय अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हास्तरावर निवडणूक विषयक कामकाजासाठी २२ समन्वय अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर यांच्याकडे आचारसंहिता प्रमुखपदाची जबाबदारी सोपवली आहे.

मतदान प्रक्रियेसाठी प्रत्येक मतदान केंद्रावर ५ कर्मचारी व १ पोलिस असणार आहेत. त्यासाठी जवळपास १९ हजार कर्मचारी नियुक्त करण्यात येणार असून, त्यांच्यासाठी २६ व २७ ऑक्टोबर रोजी निवडणूक प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे.

या निवडणुकीत माहिती व तंत्रज्ञानाच्या वापरावर भर देण्यात आला आहे. त्यासाठी सी-व्हिजिल सारखे विविध अॅप्स उपलब्ध असणार असल्याचे जिल्हाधिकारी सालीमठ यांनी सांगितले. मतदानासाठी मतदान केंद्रांवर आल्हादायक वातावरण निर्मिती केली जाणार आहे. मतदानाच्या रांगेत मतदारांना बसण्याची सोय तसेच सावलीची देखील सोय केली जाणार आहे.

या निवडणुकीत कोणत्याही पक्षाला अथवा व्यक्तीला झुकते माप दिले जाणार नाही. ८५ वर्षावरील वृध्द मतदारांना घरबसल्या मतदान करण्याची सोय करण्यात आली आहे. जिल्ह्यातील जवळपास ५५ हजार मतदारांना घरबसल्या मतदानाचा अधिकार बजावता येणार असल्याचे जिल्हाधिकारी सालीमठ यांनी सांगितले.

.. तर तीन महिन्यांचा कारावास

आचारसंहिता काळात विनापरवाना खासगी वा सार्वजनिक मालमत्तेवर पोस्टर्स लावणे घोषणा लिहिणे, झेंडे लावून मालमत्ता विदुपित करण्यावर बंदी आहे. तरीही राजकीय पक्ष वा उमेदवारांनी मालमत्ता विद्रुपित केली असल्यास त्यांनी तत्काळ काढून टाकावी.

न हटविल्यास तीन महिन्यांपर्यंत तुरुंगवास अथवा दोन हजार रुपये दंड किंवा दोन्ही शिक्षेस संबंधित व्यक्ती पात्र ठरेल असा इशारा जिल्हाधिकारी यांनी दिला आहे.

चेकपोस्टची जागा सतत बदलली जाणार

गेल्या विधानसभा निवडणुकीत २५ गुन्हे दाखल होते. तीन गुन्हे निकाली काढले असून, २२ गुन्हयाबाबत चार्जशीट दाखल असून, नऊ गुन्हे न्यायालयात प्रलंबित आहेत. आचारसंहिता दाखल होताच भरारी पथके कार्यान्वित झाले आहेत.

ठिकठिकाणी चेकनाके स्थापन केले जाणार असून, त्यांची जागा सतत बदलली जाणार आहे. परवानाधारकांची शस्त्र जमा करुन घेतली जाणार असल्याचे पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी सांगितले.

उमेदवाराला खर्चाची मर्यादा ४० लाखांची

विधानसभा निवडणुकीसाठी प्रत्येक उमेदवाराला प्रचारासाठी ४० लाख रुपयांपर्यंत खर्च करता येणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना १० हजार रुपये तर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ५ हजार रुपये अनामत रक्कम भरावी लागणार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news