कळसुबाई अभयारण्यात 1003 वन्य प्राण्यांचा संचार!

कळसुबाई अभयारण्यात 1003 वन्य प्राण्यांचा संचार!

अकोले : पुढारी वृत्तसेवा : निसर्गाची मुक्त उधळण होत असलेल्या कळसुबाई – हरिश्चंद्रगड अभयारण्यात 1003 वन्य प्राणी तर विविध प्रकारचे तब्बल 1, 852 पक्षी आढळले. दोन दिवसांच्या कालावधीत वन्य प्राणी गणनेतून ही संख्या आढळल्याचे सांगण्यात आले.

गणनेतून वास्तव्याचा उलगडा

कळसुबाई- हरिश्चंद्रगड अभयारण्यातील भंडारदरा वनक्षेत्रात कोळटेंभे, रतनवाडी, घाटघर, साम्रद, शिंगणवडी, पांजरे, उददावणे येथील जंगलातील 8 पाणवठ्यांसह राजूर वन क्षेत्रात शिरपुंजे, कुमशेत, पाचनई, अंबित, लाव्हाळी, ओतूर, पळसुंदे व कोथळे येथील 17 पाणवठ्यांवर वन्य प्राणी गणना कळसुबाई- हरिश्चंद्र अभयारण्य विभागाचे स. वन संरक्षक दत्तात्रय पडवळे व वन परीक्षेत्र अधिकारी अमोल आडे यांच्या मार्गदर्शनाखाली वन कर्मचार्‍यांनी दोन दिवस कालावधीत केली. वन्य प्राण्यांची संख्या पुढील प्रमाणे; बिबटे 12, रानडुक्कर 74, सांबर 79, भेकर 66, ससा 56, वानर 384 माकड 127, कोल्हे 27, तरस 39, मुंगूस 32, रानमांजर 33, खार 59, घोरपड 1, उदमांजर 1, शेकरू 6, निलगाई 3 तर 1 रानगवा आढळला आहे. राजूर विभागात विविध जातींचे 743 तर भंडारदरा विभागात 709 पक्षी आढळले. 30 पेक्षा अधिक प्रकारच्या पक्षांमध्ये सर्वाधिक संख्या बगळ्यांची 376 आढळली. या खालोखाल 200 कावळे दिसले. 21 घुबड, 76 बुलबूल, 5 ससाणे, 18 सुतार पक्षी 115 लाव्हरी, 30, टिटवी तर 31 भारद्वाज पक्षी आढळले. आकाशात विहार करणार्‍या 12 घारी दिसल्या. पोपट 4 तर मोर 19 दिसले.

1 हजार 852 पक्ष्यांचा मुक्त विहार

होले, पारवे, रान कोंबडी, पाण कोंबडी, सालुंकी, धोबी, कोतवाल, कुंभरकुकडा, वटवाघूळ, रानकोंबडा, चंचूक, खंड्या असे विविध पक्षी आढळल्याचे वन्यजीव विभागाकडून सांगितले आले.

कळसुबाई – हरिश्चंद्रगड अभयारण्य क्षेत्रात भंडारदरा परिसरातील गावांमधील सरपंच, ग्राम परिस्थितीकीय विकास समितीचे पदाधिकारी व तंबू कॅम्पेनिंग करणारे युवकांची संयुक्त बैठक पार पडली. यावेळी रानगव्याबाबत त्यांना माहिती देण्यात आली. रानगवा हा वन्यप्राणी कुठल्याही प्रकारे मनुष्यासाठी उपद्रवी नाही. यामुळे कोणी घाबरून नये. तो दिसल्यास त्रास देऊ नये, अशा सूचना देण्यात आल्या.

'हरिश्चंद्रगड अभयारण्य क्षेत्रात इकोसिटी घाटघर, उडदावणे, पांजरे, रतनवाडी भागात चारा वाढला आहे. साम्रद, रतनवाडी, पांजरे येथे बेर या स्थानिक गवताच्या प्रजातीसह पवण्या, मारवेल या गवताच्या प्रजातीची लागवड यंदा वन्यजीव विभागाने केली आहे. पावसाळ्यात गवत वाढले होते. अभयारण्यात रानगव्यासाठी चारा व उत्तम निवारा तयार झाला आहे.

-दत्तात्रय पडवळे,
स. वन संरक्षक, कळसुबाई- हरिश्चंद्रगड अभयारण्य.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news