धक्कादायक! कल्याण-शिळ महामार्गावर आढळली गोणी भरुन मतदानकार्ड

धक्कादायक! कल्याण-शिळ महामार्गावर आढळली गोणी भरुन मतदानकार्ड
धक्कादायक! कल्याण-शिळ महामार्गावर आढळली गोणी भरुन मतदानकार्ड

डोंबिवली, पुढारी वृत्तसेवा : कल्याण-शिळ महामार्गावर धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या महामार्गावर पिसावली गावाच्या हद्दीत असलेल्या टाटा पॉवर नाक्यावर बुधवारी (दि.19) एका अज्ञान इसमाने हजारो मतदारांची ओळखपत्रे असलेली पोतडी रस्त्यावर फेकलेली आढळून आली. ही मतदार ओळखपत्रे कल्याण पूर्वेकडील भागातील नेतिवली, पिसवली, चक्कीनाका, आदी परिसरातील रहिवाशांची असावीत, असा अंदाज असून निवडणुक आयोगाच्या अधिकाऱ्यांसह पोलिसांकडून चौकशी सुरू करण्यात आली आहे.

नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीदरम्यान या ओळखपत्रांचा वापर केला असण्याची दाट शक्यता आहे. हीच ओळखपत्रे बनावट निघाल्यास आपल्याला नाहक चौकशीला सामोरे जावे लागेल, या भीतीने कुणीही रहिवासी ओळखपत्रांच्या पोतडीजवळ गेला नाही. मात्र काही रहिवाशांनी याची माहिती मानपाडा पोलिसांना दिली. पोलिसांनी पोतडी जप्त करून रस्त्यावर विखुरलेली ओळखपत्रे जमा केली. या पोतडीवर असलेल्या शिक्क्याद्वारे ओळखपत्रे अशी बेवारस स्थितीत फेकणाऱ्यांचा छडा लागू शकतो, या दिशेने पोलिसांनी या प्रकरणाचा चौकस तपास सुरू केला आहे.

निवडणूक आयोगासह पोलिसांकडून सखोल चौकशीची मागणी

ज्या ठिकाणी ओळखपत्रांची पोतडी सापडली त्या भागातील बहुतांशी रहिवासी उत्तरभारतीय आहेत. लोकसभा निवडणूक काळात उन्हाळ्याची सुट्टी असल्यामुळे या भागातील बहुतांशी रहिवासी त्यांच्या मूळ गावी उत्तर भारतात गेले होते. त्यामुळे मतदार असलेल्या या रहिवाशांच्या नावे बनावट मतदार ओळखपत्र तयार करून निवडणुकीत त्यांचा वापर केला असावा, असा अंदाज बांधला जात आहे. या संदर्भात निवडणूक आयोगासह पोलिसांकडून सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी रहिवाशांकडून करण्यात आली आहे.

लोकसभा निवडणुकीत ओळखपत्रांचा वापर ?

मानपाडा पोलिसांनी घटनास्थळावरून ही सर्व ओळखपत्रे ताब्यात घेतली आहेत. या ओळखपत्रांची सत्यता पडताळून पाहण्यासाठी निवडणुक आयोगाच्या अधिकाऱ्यांची मदत घेण्यात येत आहे. ही ओळखपत्रे रस्त्यावर आणून कोणी टाकली ? नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत या ओळखपत्रांचा वापर झाला आहे का ? या सर्व बाजूंनी या घटनेचा तपास करण्यात येत आहे.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news