Kolhe Vs Kangana : “स्वातंत्र्य सैनिकांबद्दल बोलून त्यांचा अपमान करू नये” | पुढारी

Kolhe Vs Kangana : "स्वातंत्र्य सैनिकांबद्दल बोलून त्यांचा अपमान करू नये"

मुंबई, पुढारी ऑनलाईन

कंगना राणावतने (Kolhe Vs Kangana) केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे देशाभरात उटलसुलट प्रतिक्रिया उमटत आहेत. तिच्यावर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. विरोधी पक्षातील नेत्यांनी तिचा ‘पद्मश्री’ पुरस्कार काढून घ्यावा, अशीही मागणी केलेली आहे. त्यावर आता राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनीदेखील भाष्य केलेलं आहे.

खासदार कोल्हेंना कंगनाच्या (Kolhe Vs Kangana) विधानाबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी कोल्हे म्हणाले की, “दुर्दैव. ज्या हजारो देशभक्तांनी, क्रांतीकारकांनी, स्वातंत्र्य सैनिकांनी देशासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली. अवघ्या २३ व्या वर्षी फासावर असणाऱ्या भगतसिंग, सुखदेव, राजगुरू या सर्वांचं बलिदान, ज्यांनी आपलं रक्त सांडलं, या सगळ्यांचा अपमान करण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला”, असा प्रश्न कोल्हेंनी उपस्थित केला.

“गेल्या ७५ वर्षात देश ज्या उत्क्रांतीतून गेलाय, त्या अनुषंगाने हे अत्यंत दुर्दैवी विधान आहे. ज्यांनी स्वातंत्र्यासाठी त्याग केलाय, त्यांचा हा अपमान आहे. ज्यांनी हे विधान केलंय, त्यांनी आत्मपरिक्षण करावं. ज्या गोष्टीत आपलं काडीचंही योगदान नाही, त्या स्वातंत्र्य सैनिकांबद्दल बोलून त्यांचा अपमान करू नये, देशाचा अपमान करू नये”, असेही अमोल कोल्हे यांनी म्हंटलं आहे.

विक्रम गोखले यांनीही दिलं प्रत्युत्तर

विक्रम गोखलेंनी कंगनाचं समर्थन केलं, त्यावरही कोल्हे म्हणाले की, “कोणी म्हणत असेल हा देश भगव्याचा आहे हिरव्याचा नाही. मग, रुग्णालयात पेशंट मरत असेल, त्याला रक्ताची गरज असेल. तेव्हा तुम्ही म्हणाल का, हा पेशंट मरू द्या, त्याला भगव्याचं रक्त असेल तरच देणार, जर हिरवा असेल तर त्याला हिरव्याचंच रक्त देणार? मानवता हीच त्यापलिकडची गोष्ट आहे, वसुदैवं कुटुंबकम ही आपल्या संतांची शिकवण, परंपरा आहे. एकीकडे तुम्ही संस्कृतीचे गोडवे गात असताना दुसरीकडे वसदैवं कुटुंबकमला तिलांजली देता”, असं प्रत्युत्तर अमोल कोल्हे यांनी दिलं आहे.

पहा व्हिडिओ : पुणे- शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे पार्थिव पर्वती येथील निवास स्थानी

Back to top button