

पुणे : पुढारी वृत्तसेवा
राज्यात अठरा व त्यापुढील लसीकरणाचे एकूण नऊ कोटी 14 लाख लाभार्थी असून, त्यापैकी आतापर्यंत आठ कोटी 62 लाख लाभार्थ्यांना पहिला डोस देण्यात आलेला आहे. म्हणजेच, एकूण लाभार्थ्यांपैकी 91 टक्के जणांनी पहिला डोस पूर्ण केला आहे. सहा कोटी 10 लाख जणांनी दुसरा डोस पूर्ण केला असून ही टक्केवारी 61 टक्के इतकी आहे. दरम्यान पहिल्या डोस घेण्यासाठी येणार्यांची संख्या देखील रोडावली असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.
राज्यात 16 जानेवारी 2021 पासून लसीकरण सुरू झाले. तेव्हापासून आतापर्यंत पहिला आणि दुसरा मिळून 14 कोटी 82 लाख 41 हजार लसी देण्यात आल्या आहेत. यामध्ये 18 ते त्यापुढील सर्व वयोगटातील नागरिक तसेच 15 ते 18 वयोगटातील नागरिकांचा समावेश आहे. तसेच आतापर्यंत नऊ लाख चार हजार जणांनी दक्षता म्हणजे तिसरा डोस घेतला आहे. राज्यात एकूण 7 हजार 814 लसीकरण केंद्र असून 18 ते त्यापुढील वयोगटातील लाभार्थ्यांची संख्या नऊ कोटी चौदा लाख आहे. त्यापैकी 91 टक्के जणांनी (8 कोटी 62 लाख) पहिला डोस घेतलेला आहे. दरम्यान पहिला डोस पूर्ण करण्याचे उद्दिष्ट गेल्यावर्षी डिसेंबर अखेर होणे गरजेचे होते. मात्र जानेवारी महिना गेला तरी अजूनही ते उद्दिष्ट पूर्ण झालेले नाही.
राज्यात सर्वाधिक डोस देण्यामध्ये मुंबई पहिल्या क्रमांकावर असून आतापर्यंत मुंबईमध्ये एक कोटी 93 लाख 70 हजार डोस देण्यात आले आहेत. त्यापैकी एक कोटी चार लाख जणांना पहिला तर 86 लाख 87 हजार जणांना दुसरा डोस देण्यात आला आहे.
तसेच दोन लाख 14 हजार जणांना दक्षता डोस देण्यात आलेला आहे. दुसर्या क्रमांकावर पुणे जिल्हा असून येथे आतापर्यंत एक कोटी 66 लाख डोस देण्यात आले आहेत, अशी माहिती देण्यात आली.
राज्यात आतापर्यंत नऊ लाख चार हजार जणांना दक्षता डोस (तिसरा डोस) देण्यात आलेला आहे. आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर आणि सहव्याधी असलेल्या 60 वर्षांपुढील नागरिक, ज्यांना दुसरा डोस घेऊन नऊ महिने पूर्ण झाले आहेत त्यांना दक्षता डोस देण्यात येतो. आतापर्यंत राज्यात अशा नऊ लाख चार हजार जणांना दक्षता डोस देण्यात आलेला आहे.
सध्या पहिला डोस घेण्यासाठी येणार्यांची संख्या रोडावली आहे. दुसरा डोस घेण्यासाठी मात्र लाभार्थी वेळेवर येत आहेत. तर 15 ते 17 वयोगटातील लाभार्थींचा लसीकरणासाठी चांगला प्रतिसाद असून आतापर्यंत एकूण लाभार्थींपैकी 51 टक्के जणांनी पहिला डोस पूर्ण केला आहे. लसींचा सध्यातरी साठा भरपूर आहे.
– डॉ. सचिन देसाई, राज्य लसीकरण अधिकारी
2 लाख 7 हजार रुग्ण अॅक्टिव्ह
राज्यात आतापर्यंत सात कोटी 46 लाख जणांच्या कोविड चाचण्या करण्यात आल्या असून, त्यापैकी आतापर्यंत 77 लाख पाच हजार 959 चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत. त्यापैकी 73 लाख 67 हजार आजारातून बरे झाले असून, सध्या राज्यात दोन लाख 7 हजार रुग्ण अॅक्टिव्ह आहेत. यापैकी पुणे, नागपूर येथे सर्वाधिक रुग्णसंख्या आहे. दिवसेंदिवस अॅक्टिव्ह रुग्णसंख्या कमी होत आहे. राज्यात सर्वाधिक अॅक्टिव रुग्ण पुणे जिल्ह्यात असून, त्यांची संख्या एकूण 59 हजार 204 इतकी आहे. त्यापैकी 56 हजार 887 घरीच उपचार घेत असून, हॉस्पिटलमध्ये केवळ 2317 रुग्ण दाखल आहेत. त्यापाठोपाठ नागपूर जिल्ह्यात 24 हजार 600 इतकी रुग्णसंख्या आहे. तसेच नाशिकमध्ये 15 हजार 594, ठाण्यात 15 हजार 254, मुंबई 9 हजार 900 आणि नगरमध्ये 9 हजार 588 रुग्ण अॅक्टिव्ह आहेत. तर इतर जिल्ह्यात 9 हजारांच्या आत रुग्ण दाखल आहेत.
लसीकरण दृष्टिक्षेपात
एकूण लाभार्थी – 9 कोटी 14 लाख
पहिला डोस घेतलेले : 8 कोटी 62 लाख (91 टक्के)
दोन्ही डोस घेतलेले : 6 कोटी 10 लाख (61 टक्के)
15 ते 17 वयोगटातील लसीकरणासाठी राज्यात एकूण लाभार्थी : 60 लाख, त्यापैकी पहिला डोस घेतलेले 33 लाख (51 टक्के)
राज्यात कोविशिल्ड लशींचा साठा : 80 लाख