चौपाडमधील मोबाईल दुकान फोडले; कोयत्याने हल्ला | पुढारी

चौपाडमधील मोबाईल दुकान फोडले; कोयत्याने हल्ला

सोलापूर : पुढारी वृत्तसेवा तडीपार असलेल्या आरोपीने चौपाड येथील मोबाईल दुकान फोडून तरुणावर कोयत्याने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना चौपाडातील मोबाईल दुकानात घडली. यात हल्लेखोर तडीपार आरोपीस अटक करण्यात पोलिसांना यश आले.
काल शुक्रवारी (दि.5 ऑगस्ट) रात्री पावणे नऊ वाजण्याच्या सुमारास संजय मोबाईल शॉपी येथे हा प्रकार घडला. याप्रकरणी नागार्जुन मोहन जोपल्ली (वय-29,रा. दाजी पेठ) याने फौजदार चावडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्याच्या फिर्यादीवरून विपुल रामदास शिंदे (रा.सोलापूर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून, त्याला पोलिसांनी अटक केली आहे.

विपुल शिंदे याने संजय मोबाईल शॉपी या दुकानाची यापूर्वी नासधूस केल्याने दुकानाचे मालक पंकज फाटे व मॅनेजर महमंदजाफर अब्दुलगफार शेख यांनी विपुल शिंदे याच्याविरुद्ध तक्रार दिली होती. या तक्रारीवरून विपुल शिंदे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता व त्याला तडीपार देखील करण्यात आले होते. याच दिलेल्या तक्रारीचा राग मनात धरून तुझा मालक कुठे गेला आहे. त्याच्यामुळे मी जेलमध्ये गेलो, तुम्हाला मी सोडणार नाही, तुम्हाला धंदा करायचा असेल तर मला महिन्याला दहा हजार रुपये द्या नाहीतर मी धंदा करू देणार असे धमकावले. धमकावत विपुल शिंदे याने लोखंडी कोयत्याने दुकानातील काचेची तोडफोड करून शिवीगाळ केली.

त्यानंतर त्याच्या हातातील लोखंडी कोयत्याने दुकानातील काचेची तोडफोड करून तू मध्ये येऊ नकोस असे म्हणून फिर्यादी नागार्जुन याला कोयत्याने वार करून गंभीर दुखापत केले आहे. तसेच शिंदे याच्या दहशतीमुळे घाबरून त्या भागातील व्यापार्‍यांनी पळापळ करून दुकानाचे शटर बंद केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या घटनेची नोंद फौजदार चावडी पोलिस ठाण्यात झाली असून पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक गायकवाड हे करीत आहेत.

Back to top button