ट्रॅक्टर ट्रॉली चोरणारा जेरबंद; 8 लाखांचा मुद्देमाल जप्त | पुढारी

ट्रॅक्टर ट्रॉली चोरणारा जेरबंद; 8 लाखांचा मुद्देमाल जप्त

सोलापूर ः पुढारी वृत्तसेवा सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी चोरट्यास अटक करून त्याच्याकडून सुमारे 8 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. दिगंबर अरूण रणसिंग (वय 28, रा. जळगाव, ता. आष्टी, जि. बीड) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव असून त्याचा साथीदार प्रदीप बजरंग वाकडे (रा. पोस्ट उपळाई बुद्रुक, ता. माढा) हा फरार आहे.
24 डिसेंबर 2017 रोजी पहाटेच्या सुमारास माढा रेल्वे लाईन, माढा येथील माने यांचे घरासमोर उभा केलेला निळ्या रंगाचा सोनालिका कंपनीचा ट्रॅक्टर हेड व निळ्या रंगाची डम्पिंग ट्रॉली असा 7 लाख 71 हजार 300 रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याबाबत गोवर्धन जनार्दन आतकरे (वय 29, रा. देगांव वाळुज ता. मोहोळ) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन माढा पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल झाला होता.

सोलापूर ग्रामीण जिल्ह्यामधील वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आणणेकामी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस पथक हे माढा ते शेटफळ रोडवरील संभाजी नगर येथील हॉटेल केसरीचे समोर हजर असताना त्यांना गेल्या काही वर्षापूर्वी चोरीस गेलेला ट्रॅक्टर हा उपळाई बुद्रुक येथील बजरंग वाकडे यास दिला असल्याची माहिती मिळाली. त्यावरून पोलिसांनी उपळाई येथे जाऊन गुन्ह्यातील ट्रॅक्टर हेड ताब्यात घेऊन अधिक विचारपूस केली असता, त्याने सदरचा टॅक्टर जळगांव येथील त्याच्या ओळखीचा दिगंबर रणसिंग याच्याकडून घेतल्याचे समजले.

त्यामुळे पोलिसांनी जळगांव येथे जाऊन दिगंबर रणसिंग यास ताब्यात घेवून त्याच्याकडे विचारपूस केली असता, त्याने सांगितले की, मागील 4 वर्षापूर्वी त्याच्या साथीदारासह माढा येथून चोरी केला असल्याचे सांगितले. व ट्रॉली स्वतः वापरत असल्याचे सांगितले. त्यानुसार पोलिसांनी ट्रॅक्टर व डम्पिंग ट्रॉली, गुन्हयात वापरलेली मोटार सायकल असा 7 लाख 90 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे ही कामगिरी पोलिस अधीक्षक श्रीमती तेजस्वी सातपुते, अपर पोलीस अधीक्षक हिंमत जाधव यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सुहास जगताप यांचे नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक नागनाथ खुणे, पोलिस अंमलदार संदीप काशिद, बापू शिंदे, मोहन मनसावाले, लालसिंग राठोड, अजय वाघमारे, चालक प्रमोद माने यांनी बजावली आहे.

Back to top button