

मंगळवेढा : पुढारी वृतसेवा येथील ग्रामीण रुग्णालयात स्त्री रोगतज्ज्ञ म्हणून डॉ. सुलोचना लक्ष्मण जानकर ह्या प्रथमच रुग्णालयास प्राप्त झाल्याने आत्तापर्यंत 378 महिलांच्या डिलीव्हरी सुस्थितीत केल्याने दिवसेंदिवस ग्रामीण रुग्णालयाकडे महिलांचा ओढा वाढत असल्याचे चित्र आहे. दरम्यान, सोलापूर शासकिय रुग्णालयाचे डॉ. प्रदीप ढेले यांच्या मार्गदर्शनाखाली ही यंत्रणा चालत आहे. मंगळवेढा ग्रामीण रुग्णालयाच्या इतिहासात प्रथमच स्त्रिरोग तज्ज्ञ म्हणून जानकर ह्या कार्यरत झाल्या आहेत. त्यांनी कार्यभार स्वीकारल्यापासून जुलै अखेर जवळपास 378 डिलीव्हरी केसेस पूर्ण केल्या आहेत. यामध्ये डिलीव्हरी केसेस बरोबर स्त्री नसबंदी, नलिकेत गर्भ राहणे, पिशवी साफ करणे, गर्भपात, महिलांच्या अंगावरील पांढरे जाणे आदी उपचारही केले जात असल्याने येथे महिलांचा वाढता प्रतिसाद मिळत आहे. जननी सुरक्षा योजनेअंतर्गत सर्व मोफत केले जाते आहे.
गर्भधारणा झाल्यापासून ते डिलीव्हरीपर्यंतच्या सर्व तपासण्या मोफत केल्या जात आहे. सोनोग्राफी केंद्राकडे गर्भवती महिलेची सातव्या किंवा नवव्या महिन्यात एक वेळेस फ्रि तपासणी केली जाते. अन्य सोनोग्राफी तपासणीला गोरगरीब महिलांना खाजगीमध्ये पैसे भरून तपासण्या कराव्या लागतात, खाजगीत प्रत्येक सोनोग्राफी तपासणीची फी 800 रुपये आकारली जात आहे. ज्या महिलेस रक्त कमी आहे त्यांना ग्रामीण रुग्णालयात इंजेक्शनही उपलब्ध आहेत.हिमोग्लोबीनची तपासणी केली जाते. गर्भमातेचे ब्लड प्रेशर,साखरेचे प्रमाण, थायरॉईड, रक्त, लघवी आदीची तपासणी मोफत करण्याची सोय येथे उपलब्ध आहे. याचा लाभ घ्यावा असे आवाहन डॉ. सुलोचना जानकर यांनी केले आहे .आत्तापर्यंत त्यांच्या कालावधीत 221 नॉर्मल, तर 157 सिझर डिलीव्हरी केसेस झाल्या आहेत.