सोलापूर विद्यापीठाचा पुरस्कार वादाच्या भोवर्‍यात | पुढारी

सोलापूर विद्यापीठाचा पुरस्कार वादाच्या भोवर्‍यात

सोलापूर ः संदीप येरवडे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या वतीने वर्धापन दिनाच्या निमित्ताने व्यक्ती आणि संस्थांना पुरस्कार दिला जातो. परंतु हा पुरस्कार जाहीर करताना कुलगुरूंनी व्यवस्थापन परिषदेला विश्वासात न घेता एकाधिकारशाहीने निवड केली आहे. त्यामुळे व्यवस्थापन परिषदेच्या सदस्यांमधून नाराजीचा सूर उमटत आहे. विद्यापीठाकडून प्रत्येक वर्षी जीवन गौरव, उत्कृष्ट महाविद्यालय, उत्कृृष्ट प्राचार्य, उत्कृष्ट शिक्षक व उत्कृष्ट शिक्षकेत्तर कर्मचारी आदी पुरस्कार दिले जातात. मुळात हा पुरस्कार देण्यासाठी व्यवस्थापन परिषदेच्या वतीने एक तज्ज्ञ समिती नेमून नव्याने नियमावली करण्यात आली. यामध्ये स्पष्टपणे असे नमूद केले आहे की पुरस्काराच्या संदर्भामध्ये योग्य ती जाहिरात देऊन पात्र व्यक्ती अथवा संस्थांकडून मुदतीमध्ये अर्ज मागविण्यात येतील.

आलेल्या अर्जांची छाननी करून व्यवस्थापन परिषदेच्या वतीने नेमलेल्या परीक्षकांच्या माध्यूातून एक निकाल पत्र तयार करण्यात येईल व शेवटी परीक्षकांनी तयार केलेले निकाल पत्रक व्यवस्थापन परिषदेच्या अंतिम मान्यतेनंतर या पुरस्कारांची घोषणा करण्यात येईल. असे असतानाही गेली तीन वर्षे कुलगुरू या नियमावलीला छेद देऊन स्वतःच पुरस्काराची घोषणा करीत आहेत. ही माहिती विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेतील सदस्यांनी त्यांची नावे प्रसिद्ध न करण्याच्या अटींबर दैनिक ‘पुढारी’स दिली.

सुरुवातीला दोन वर्षे कोरोनाच्या कारणामुळे त्यांनी घेतलेल्या निर्णयाला कोणीही विरोध केला नव्हता. तथापि, आता ज्या पद्धतीने हे पुरस्कार जाहीर झालेले आहेत ते पाहता यातून कुलगुरूंची एकाधिकारशाही स्पष्ट दिसून येते. व्यवस्थापन परिषदेला विचारात न घेण्याचे त्यांचे जे एकंदरीत लोकशाही विरोधी धोरण चालू आहे, त्यामध्ये कोणतीही सुधारणा झाली नाही. वास्तविक पाहता 18 जुलै 2022 रोजी व्यवस्थापन परिषदेची बैठक झाली होती. त्या बैठकीमध्ये अनेक विषय मांडण्यात आले. त्यादिवशी हा विषय विषयपत्रिकेवर घेऊन सर्व सोपस्कार पूर्ण करता आले असते. कुलगुरू ह्या जाणीवपूर्वक अशा प्रकारचे लोकशाहीविरोधी निर्णय घेत असल्याने व्यवस्थापन कुलगुरू आणि व्यवस्थापन परिषदेमधील वाद पुन्हा उफाळत असल्याचे दिसत आहे.

कुलगुरू व व्यवस्थापन परिषद पुन्हा आमनेसामने

विद्यापीठ व्यवस्थान परिषद आणि कुलगुरूंमध्ये हल्ली वेगवेगळ्या विषयांवर वारंवार मतभेदाचे प्रसंग समोर येत आहेत. कुलगुरू विद्यापीठासंदर्भात कोणताही निर्णय घेताना व्यवस्थापन परिषदेस विश्वासात घेत नाहीत, त्या मनमानीपद्धतीने कारभार करतात अशा स्वरूपाच्या तक्रारी मध्यंतरी व्यवस्थापन परिषदेच्या सदस्यांनी माध्यमांसमोर तसेच राज्यपालांपर्यंत तक्रारी केल्या आहेत. त्यातच आता विद्यापीठ पुरस्कार जाहीर करण्यावरून पुन्हा एकदा व्यवस्थापन परिषद आणि कुलगुरू आमनेसामने आले आहेत.

पुरस्कार निवडीच्या वेळी व्यस्थापन परिषदेचे तीन सदस्य सहभागी होते. त्यामुळे व्यवस्थापन परिषदेला विचारात घेऊन पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे.
– डॉ. मृणालिनी फडणवीस,
कुलगुरू

Back to top button